शेती करताना जमीन आणि पाण्याएवढेच त्यासाठी लागणाऱ्या वीज पुरवठ्याला खूप महत्त्व असते. अपुरा, अनियमित आणि खंडित वीजपुरवठ्याने शेतीत मोठे नुकसान सहन करावे लागते. तसेच या व्यवसायात सातत्य राखणेही अवघड होते. या समस्येवरच मात करत सोलापुरातील एका शेतकऱ्याने केलेला हा यशस्वी प्रयोग.

शेती करायची तर पाण्याबरोबर वीजसुद्ध अत्यावश्यक बाब ठरते. परंतु अनेक वेळा ग्रामीण भागात विजेचा सतत लपंडाव चाललेला असतो. या प्रश्नी ग्रामीण भागात कायम अस्वस्थता आणि अशांतता दिसून येते. परंतु अशा परिस्थितीत गेल्या बारा वर्षांपासून येथील एका शेतकऱ्याला कधीही वीज बिल आले नाही की वीजबिल, वीज भारनियमनाचा कधी त्रासही झाला नाही. हा वीजचोरीचा प्रकार म्हणावा तर तसे अजिबातच नाही. खंडित वीजपुरवठा आणि वीजबिलांच्या कटकटीपासून कायमची सुटका करून घेत शेतकऱ्याने आपल्या शेतात विविध अभिनव प्रयोग यशस्वी केले तर ती नवलाईच म्हणायची. होय, सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात पापरी गावात बळिराम भोसले या साठ वर्षाच्या वयोवृद्ध आणि अल्पशिक्षित शेतकऱ्याने आपल्या शेतात सौरऊर्जा प्रकल्प उभारून ही किमया करून दाखविली आहे. एवढेच नव्हे तर शेतात चक्क सफरचंद, बदाम, जपानी फळ यांसारख्या फळबागांचेही प्रयोग भोसले यांनी यशस्वीरीत्या हाती घेतले आहेत. सोलापूर जिल्ह्यासह आसपासच्या भागात हा कौतुकाचा आणि कुतूहलाचा विषय ठरला आहे.

With restrictions on the export of non basmati rice the demand from the domestic market also declined Pune news
आंबेमोहर, कोलमचे दर घसरले; जाणून घ्या, ग्राहकांना काय फायदा होणार ?
panvel, water shortage, water shortage in Karanjade, Karanjade, water shortage on gudhipadwa, protest for water shortage, Karanjade citizens, panvel citizens, marathi news,
पनवेल : करंजाडेतील रहिवासी अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे चिंतेत
wheat India wheat production estimated at 1120 lakh tonnes this year
यंदा गव्हाचे उच्चांकी उत्पादन? तापमान वाढीची झळ कमी; ११२० लाख टन उत्पादनाचा अंदाज
navi mumbai, Valve Repair, Traffic Congestion, footpath close, Pedestrian Woes, kopar khairane, teen taki area, marathi news,
व्हॉल्व दुरुस्तीच्या कामामुळे पादचाऱ्यांचे हाल; कोपरखैरणेत तीन टाकी परिसरात पदपथ बंद

उत्पादन खर्चाचा शेतीमालाच्या विक्रीबरोबर कधीच मेळ लागत नसल्यामुळे शेतकऱ्यांचा खिसा फाटकाच राहतो. अशा कठीण परिस्थितीत योग्य मार्गदर्शन मिळाले आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा डोळसपणे वापर केला, तर उत्तम शेती करता येते. खर्चात कपात करून कमी खर्चाचे आधुनिक शेती तंत्रज्ञान स्वीकारले, तर निश्चितपणे फायदा होऊ शकतो, याचा वस्तुपाठ भोसले यांनी आपल्या अभिनव शेतीप्रयोगांतून दाखवून दिला आहे.

भोसले यांचे शिक्षण कसेबसे नववीपर्यंत होऊ  शकले आहे. लहानपणापासून वडिलोपार्जितच शेतीतच स्वत:ला गुंतवून घेताना भोसले यांनी उपलब्ध पाण्याच्या आधारे पारंपरिक पद्धतीने उसाची शेती केली आहे. परंतु उसाला वेळोवेळी पाणी देण्यासाठी वीज अत्यावश्यक असते. पाणी असूनही वीज नसल्यास डिझेलच्या आधारे वीजपंप चालवावा लागतो. वरचेवर वीज आणि इंधनाचा खर्च वाढू लागला असून त्यात पुन्हा अखंड विजेचा भरवसा नसतो. रात्री-अपरात्री वीज असेल, तेव्हाच शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना रात्रभर जागे राहावे लागते. या साऱ्या प्रश्नांना फाटा देत भोसले यांनी आपल्या शेतात बारा वर्षापूर्वी सौरऊर्जा प्रकल्प उभारून वीजबिल, वीजतोडणी, भारनियमन यापासून मुक्तता करून घेतली आहे.  केवळ एवढ्यावर न थांबता त्यांनी या शेतीत सफारचंद, बदाम, जपानी फळबागांचे अभिनव प्रयोग हाती घेतले आहेत. हे प्रयोग यशस्वी होत असून त्याचे सार्वत्रिक कौतुक होत आहे.

आपल्या या प्रयोगाविषयी भोसले भरभरून बोलतात. ते म्हणतात, आपण नेहमीच शेतात नवनवीन प्रयोग करतो. चांगले शेती उत्पादन घ्यायचे तर त्यासाठी प्रथम पाण्याची उपलब्धता गरजेची असते. त्याशिवाय शेतात मुबलक प्रमाणात वीजही असावी लागते. त्याचे योग्य नियोजन करून आपण शेती कसण्यास सुरुवात केली. परंतु विजेचा वाढीव खर्च आणि वाढते भारनियमन यांचा पाठलाग होता. विजेची वेळ ठरलेली असायची. रात्री-अपरात्री वीज असताना पिकांना पाणी देण्यासाठी रात्र रात्रभर जागे राहावे लागत असे. दिवसभर शेतात राबून रात्री निवांतपणे झोप घेणे हे शक्य नव्हते. त्यामुळे पार वैतागून गेलो होतो.

दरम्यान, एके दिवशी पुण्यात देशपातळीवर भरलेले कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी गेलो. तेथे अनेक कुतूहलाच्या गोष्टी पाहायला मिळाल्या. यात तीन अश्वशक्तीची सौरऊर्जेवर चालणारी मोटारीवर नजर गेली. त्याविषयी मनातील कुतूहल आणखी वाढले. लागलीच संबंधित कंपनीच्या अभियंत्याशी संपर्क साधून सौरऊर्जा प्रकल्पाविषयीची अधिक माहिती जाणून घेतली. त्या वेळी सुमारे अडीच लाख रुपये खर्चाचा तो सौरऊर्जा प्रकल्प मनापासून भावला. त्यानंतर शेतात हा प्रयोग राबविण्याचे ठरविले. त्यानुसार शेतघराच्या छतावर सौरऊर्जा प्रकल्पाची उभारणी केली. यात सहा प्लेट बसविल्या. त्यातील चार प्लेटवर तीन अश्वशक्तीची मोटार आणि दोन प्लेटवर घरातील विजेची गरज भागविली. सोरऊर्जेसाठी नंतर ७५ हजारांचे अनुदानही मिळाले.

अशा प्रकारे शेतात सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर विजेसाठी महावितरणवर अवलंबून राहावे लागले नाही. वीजबिल भरण्याची डोकेदुखीही राहिली नाही. मुबलक वीज उपलब्ध झाल्याने दिवसभरात चार एकर शेती भिजवून घेणे सहज शक्य झाले. त्यासाठी रात्रीच्या वेळी झोपमोड करून शेतात पिकांना पाणी देण्यासाठी गरज पडत नाही. दिवसभराच्या कामांमुळे थकल्यानंतर ताण-तणावाविना रात्री शांतपणे झोपता येते, बळिराम भोसले सांगत होते. शेतात सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करून बारा वर्षे उलटली. परंतु आतापर्यंत एकदाही त्यात तांत्रिक बिघाड झाला नाही. दुरुस्ती व देखभालीचा खर्च नाही. शिवाय अपघातांची भीतीही नाही. बॅटरी चार्जिंगची सोय असल्यामुळे त्या आधारे घरातील वीजपुरवठा रात्रीच्या वेळी सुरळीत राहतो. हा सौरऊर्जा प्रकल्प सुमारे २५ वर्षे कार्यरत राहून सेवा देऊ शकतो. सौरऊर्जा पंपाच्या देखभाल व दुरुस्तीसाठी पाच वर्षे तर सौर पॅनेलसाठी दहा वर्षांची वॉरंटी देण्यात आली आहे. या कालावधीत सौरऊर्जा पंप किंवा सौर पॅनेलची मोफत दुरुस्ती करण्याची किंवा नादुरुस्त भाग नव्याने बदलून बसवून देण्याची जबाबदारी संबंधित एजन्सीची असते. भोसले हे याबाबतचा आपला अनुभव समाधान देणारा ठरल्याचे नमूद करतात. आणखी उल्लेखनीय बाब म्हणजे सौरऊर्जा पंपाच्या साहित्याची चोरी झाल्यास त्याची तक्रार नजीकच्या पोलीस ठाण्यात करता येते. या सौरऊर्जा पॅनेलचा सर्वसाधारणपणे पाच वर्षांचा विमा काढलेला असल्यामुळे त्याची भरपाई मिळते. सौरऊर्जा हे आधुनिक तंत्रज्ञान वापरून तयार करण्यात आल्यामुळे कोणत्याही नैसर्गिक आपत्तीत त्याचे क्वचितच नुकसान होते. वीज कोसळण्याचा धोका टाळण्यासाठी सौरऊर्जा पंपासोबत वीज संरक्षण यंत्र बसविण्यात आले आहे.

सफरचंद, बदामाची लागवड

सोलापूर जिल्ह्यात ऊस उत्पादन दिवसेंदिवस वाढले आहे. देशात सर्वाधिक साखर कारखाने याच जिल्ह्यात आहेत. परंतु साखर कारखान्यांकडून उसाला किफायतशीर दर मिळण्याची शाश्वती नसते. त्यामुळे शेतकऱ्यांनाही आर्थिकदृष्ट्या उसाची शेती आता परवडेना झाली आहे. बळिराम भोसले यांनीही वर्षानुवर्षे करीत असलेल्या उसाच्या शेतीला पर्याय म्हणून फळबागांची शेती हाती घेतली आहे. फळबागा म्हणजे सर्वसाधारणपणे र्डांळब, द्राक्षे, आंबा, पेरू, केळी, चिकू, बोर आशा फळांची नावे नजरेसमोर येतात. परंतु बळिराम भोसले यांनी त्याही पुढचा विचार करून सफरचंद, बदाम, जपानी फळबागांचा धाडसी प्रयोग हाती घेतला आहे. त्यासाठीचे पुरेसे प्रत्यक्ष ज्ञान नसतानाही केवळ इंटरनेटवरून माहिती घेऊन भोसले यांनी ही धाडसी पाऊलवाट धरली आहे. सुका मेवा म्हणून परिचित असलेल्या बदाम बागेची त्यांनी अध्र्या एकर क्षेत्रात उभारणी केली आहे. एरव्ही, बदामाचे उत्पादन प्रामुख्याने कॅलिफोर्निया, अमेरिका, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलियात आणि भारतात उत्तर प्रदेशासारख्या भागात काही ठिकाणी घेतले जाते. हा प्रयोग भोसले यांनी सोलापूर जिल्ह्यात प्रथमच केला आहे. ‘युट्यूब’वर मिळणाऱ्या माहितीच्या आधारे भोसले यांनी जम्मू काश्मीरमधून बदामाची रोपे मागविली. प्रत्येकी ३०० रुपये किमतीत बदामाचे रोप उपलब्ध झाले. १४ बाय १८ फूट अंतरावर ४० रोपांची लागवड केली. सध्या ही रोपे सात महिन्यांची झाली आहेत.

भोसले यांनी दोन एकरात ‘हरमन-९९’ या जातीच्या ७०० सफरचंदाच्या रोपांची लागवड केली आहे. अर्थात ही रोपेसुद्धा जम्मू काश्मीर आणि उत्तर प्रदेशातून मागविली असून त्याची किंमत प्रतिरोप १५० रुपये होती. या रोपांची लागवड १४ बाय १० फुटांवर केली आहे. ठिबक सिंचन पद्धतीने रोपांना पाणी दिले जाते. रोपांची जोपासना करताना रासायनिक खतांऐवजी सेंद्रिय खते वापरली जातात. रोपांची शंभर टक्के वाढ झाली असून सध्या ही रोपे २२ महिन्यांची झाली आहेत. लवकरच रोपांची छाटणीही होणार आहे.लवकरच फुले येतील. छाटणीनंतर सुमारे साडेपाच महिन्यांत झाडांना फळधारणा होणे अपेक्षित आहे. साधारणत: येत्या मे-जून महिन्यात फळांचा बहार येईल. एका झाडाला प्रत्येकी २०० ते २५० ग्रॅम वजनाची १० ते १५ किलो सफरचंदाचे उत्पादन होईल, असा भोसले यांचा अंदाज आहे. सफरचंद बागेला कमीजास्त प्रमाणात विविध बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यासाठी वेळोवेळी लक्ष देऊन प्रतिबंधक उपाय करावे लागतात. सांगोला, सांगली, माढा, करमाळा आदी भागात काही शेतकऱ्यांनी सफरचंद शेतीचे प्रयोग केले आहेत. या शेतकऱ्यांशी भोसले यांचा नेहमीच संपर्क असतो. सध्या तरी भोसले यांच्या सफरचंद बागेत सुदैवाने रोगांचा प्रादुर्भाव झाला नाही.

जपानमध्ये प्रामुख्याने जपानी फळांचे उत्पादन घेतले जाते. या फळांच्या बागेचाही अफलातून प्रयोग बळिराम भोसले यांनी हाती घेतला आहे. सफरचंदसदृश असलेल्या जपानी फळझाडांना फळे येण्यास पाच वर्षाचा कालावधी लागतो. या फळांची रोपे जम्मू काश्मीरमध्ये मिळाली नाहीत. ती जपानमधूनच ऑॅनलाइन मागविली आहेत. प्रतिरोप दोनशे रुपये दराने ही रोपे विमानाने पोहोचली. या रोपांची लागवड करून दोन वर्षे झाली आहेत. झाडांना फळे येण्यासाठी आणखी तीन वर्षांची वाट पाहावी लागणार आहे. सफरचंद असो वा बदाम किंवा जपानी फळ असो, या फळबागांसाठी लागणारी जमीन पोषक असल्याचे  भोसले सांगतात.

आंतरपिकांचा प्रयोग

भोसले यांनी आंतरपिकांचेही प्रयोग चालविले आहेत. सध्या बदामाच्या बागेत मक्याचे पीक घेतले जात आहे. तर सफरचंद बागेतील मोकळ्या जागेत कांदा, गहू, कलिंगड, काकडी व इतर पिके घेतली जात आहेत. या मिश्र पिकांतून अधिक आर्थिक फायदा मिळतो. भोसले यांनी दोन लाख रुपये खर्च करून डांगर भोपळ्याचीही (काशी भोपळा) लागवड केली ती शेवग्यासह संमिश्र स्वरूपात. डांगर भोपळा हे बारमाही येणारे पीक आहे. दुर्मीळ असे हे वेलवर्गीय पीक लागवडीचे धाडस सहसा केले जात नाही. भोसले यांनी धाडस दाखवून भोपळ्याचे पीक घेतले आहे. उपवासासाठी भोपळा भाव खाऊन जातो. मुंबई, पुणे, ठाणे व अन्य महानगरांमध्ये मोठमोठ्याल्या हॉटेलांमध्ये भोपळ्याला मागणी आहे. भोपळ्यासाठी खडकाळ व पाण्याचा निचरा होणारी जमीन लागते. पूर्ण वाढ झालेल्या भोपळ्याचे वजन सहा ते सात किलोपर्यंत भरते. प्रतिकिलो आठ ते नऊ रुपये दर मिळतो. २२ टनांएवढे भोपळा उत्पादन होईल, अशी भोसले यांची अपेक्षा आहे. शेताच्या बांधावर नारळ झाडांची लागवड करण्यात आली असून या वर्षी नारळ उत्पादन सुरू होईल. याशिवाय शंभर केशर आंबा झाडांची लागवड केली असून त्याचेही उत्पादन यायला उशीर होणार नाही. फणस, सुपारी, दालचिनी, चिकू यांची लागवड भोसले यांनी केली आहे. यापैकी सुपारी झाडांना फळे लागली आहेत. फणसही बहरत आहे.

भोसले यांनी छोटेखानी स्वरूपात उभारलेले बंदिस्त शेळी पालन केंद्रही उपयुक्त ठरले आहे. शेळ्यांच्या विष्ठेचा वापर शेतात खत म्हणून केला जातो. त्यामुळे शेतीचा कस वाढण्यास मदत झाली आहे. शेळ्यांबरोबर म्हशीचेही पालन होते. भोसले यांची दोन एकर जमीन कालव्यासाठी गेली असून कालव्याच्या कडेला भोसले यांनी मोठ्या प्रमाणात सुबाभळाची लागवड केली आहे. शेळ्यांना सुबाभूळ खाण्यासाठी उपयुक्त आहे. त्यासाठी चारा आणण्यासाठी इतर ठिकाणी शेळ्यांना भटकंती करावी लागत नाही. यात वेळ वाचतो आणि शेतातील अन्य कामेही करता येतात. भोसले यांनी चालविलेले अभिनव शेतीचे प्रयोग म्हणजे जणू आसपासच्या शेतकऱ्यांसाठी प्रयोगशाळाच ठरावी.

aejajhusain.mujawar@expressindia.com