लातूर- येत्या १ जून ते ३० सप्टेंबपर्यंत पूर्वपरवानगीशिवाय साखर निर्यात करता येणार नाही, असा केंद्र शासनाने घेतलेला निर्णय योग्य आहे. त्यामुळे साखरेचे भाव गडगडतील ही भीती निराधार असल्याचे प्रतिपादन खासगी साखर कारखानदार संघटनेचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी येथे केले.  गेल्यावर्षीचा १०७ लाख टन साखरेचा साठा शिल्लक असून आत्तापर्यंत राज्यातील साखर उत्पादन ३५० लाख टन झाले आहे. देशांतर्गत साखरेची गरज २७० लाख टनांची आहे .देशात १८७ लाख टन साखर शिल्लक असून यापैकी ९० लाख टन निर्यातीचे करार आत्तापर्यंत झाले आहेत. १५ मेपर्यंत यापैकी ७४ लाख टन साखर निर्यात झाली आहे. आणखी २६ टन साखर निर्यात होणे बाकी असून केंद्र शासनाने  १०० लाख टन साखर निर्यातीचे उद्दिष्ट ठेवले असल्याचे ठोंबरे यांनी सांगितले.

१ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत साखर निर्यात करता येणार नाही, असा निर्णय घेतल्यामुळे ८७ लाख टन साखर शिल्लक राहणार आहे. पुढील वर्षी देशांतर्गत साखरेचे उत्पादन ३५० लाख टनाच्या आसपास होईल. देशांतर्गत उत्पादन वाढावे आणि दरही स्थिर राहावेत यासाठी योग्य तो निर्णय घेतला असल्याचेही ठोंबरे म्हणाले.