औरंगाबाद जिल्ह्य़ातील वैजापूर तालुक्याच्या ठिकाणापासून १६ किलोमीटर अंतरावर उद्धव जगन्नाथ खटाणे हे ५२ एकर शेतीचे मालक. एकत्र कुटुंबपद्धतीत आई, वडील, भाऊ आणि त्याची पत्नी असा परिवार. मात्र, दुष्काळात हैराण झालेल्या या बागायतदार शेतकऱ्याला गारपिटीने नव्याने मारले. दुष्काळात पिकांचे मोठे नुकसान झाले. ५२ एकर शेतीतील १४ एकरांवर ऊस लावला आहे. कापूस वेचणीनंतर काढून टाकला तेव्हा कळले, दुष्काळाने किती मारले. १० एकरांवर कापूस होता. सगळ्या वेचण्या झाल्या, तेव्हा १६ क्विंटल उत्पादन निघाले.
या वेळी कापसाचा भावही कमालीचा घसरलेला. ३ हजार ७०० रुपये दराने कापूस विकला. ६० हजार रुपये आले. पण खर्च झाला होता १ लाख २० हजार. अर्धे पैसे कापसात बुडाले. ऊस काढण्यावर नवीन लागवड केली होती. फोडवा फुटला होता. गारपिटीमुळे नव्याने लागण केलेला ऊस कसा येईल, माहीत नाही. जमिनीच्या हिशेबात तीन विहिरी आहेत, तीन विंधनविहिरीही घेतल्या. तसे वेळेवर पाणी देता आले नाही, असे नाही. पण पाऊसच कमी झाला. त्यामुळे पाणी देऊन देऊन किती देणार? कापूस हातचा गेलाच होता. गारपिटीत नुकसान झाले ते गहू आणि कांद्याचे. चार एकरावरचा गहू गेला आणि कांद्याचेही मोठे नुकसान झाले. एवढे की, आता पात शिल्लकच राहिली नाही. दुष्काळाने मारले आणि गारपिटीने गाठले. सगळे अर्थकारणच बिघडले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 17th Mar 2015 रोजी प्रकाशित
दुष्का़ळाने मारले अन आता गारपिटीने गाठले
उद्धव जगन्नाथ खटाणे हे ५२ एकर शेतीचे मालक.दुष्काळात हैराण झालेल्या या बागायतदार शेतकऱ्याला गारपिटीने नव्याने मारले.

First published on: 17-03-2015 at 01:54 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Femine beat now hailstorm catch