सावंतवाडी : सणासुदीचे दिवस सुरू झाल्याने जेवणाची चव वाढवणारे ‘श्रीफळ’ अर्थात नारळ महागले असल्याने खिशाला कात्री बसत आहे. सध्या नारळाचे दर सुमारे ५० ते ६० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. या दरवाढीचे मुख्य कारण म्हणजे हवामानातील बदल आणि वन्यप्राण्यांचा वाढलेला उपद्रव, ज्यामुळे नारळाचे उत्पादन घटले आहे. बागायतदारांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा नारळाच्या उत्पादनात ७० टक्क्यांची घट झाली असून, केवळ ३० टक्केच उत्पादन मिळत आहे.
सण-उत्सवांसाठी नारळाची मोठी मागणी असते.गणेश चतुर्थी, पितृपक्ष, दिवाळी, तसेच लग्नसोहळे अशा विविध सणांमध्ये नारळाला मोठी मागणी असते. काही वर्षांपूर्वी नारळाला फारशी किंमत मिळत नसल्यामुळे अनेक बागायतदार नारळाऐवजी काजू, सुपारी, पोफळी आणि केळीच्या बागांकडे वळले होते. परंतु आता नारळाला चांगला भाव मिळत आहे. मात्र, मागणीनुसार पुरवठा करणे बागायतदारांना शक्य होत नाहीये.
उत्पादन घटण्याची प्रमुख कारणे :
नारळ उत्पादन घटण्यामागे अनेक कारणे आहेत. कोकणात ‘कल्पवृक्ष’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नारळाच्या बागांची लागवड तशी कमी आहे. त्यातच, हवामान बदलामुळे उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. यंदा फळधारणा होत असताना उष्णता वाढल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच, पावसाच्या वेळापत्रकात झालेला बदलही यासाठी कारणीभूत ठरला आहे.
यासोबतच, लाल तोंडाच्या माकडांचा आणि शेकरूंचा हैदोस बागायतदारांसाठी डोकेदुखी ठरत आहे. हे प्राणी नारळाच्या झाडांवरील फळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत. त्यामुळे निसर्गाचा लहरीपणा आणि वन्यप्राण्यांचा त्रास यामुळे बागायतदार चिंतेत आहेत. दरवर्षी तीन ते चार वेळा उत्पादन घेणारे बागायतदार गेल्या वर्षापासून जेमतेम ३० टक्केच उत्पादन मिळवत आहेत. वर्षभर देखभाल, साफसफाई, औषधे आणि खतांवर होणारा खर्च आणि मिळणारे उत्पादन यांचा ताळमेळ बसत नसल्याने बागायतदारांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे.
केरळ आणि कारवारमधून येणाऱ्या नारळाची आवक थांबली :
पूर्वी केरळ आणि कारवार परिसरांतून मोठ्या प्रमाणात नारळ विक्रीसाठी येत होते. परंतु, आता त्या ठिकाणी नारळावर आधारित प्रक्रिया उद्योग सुरू झाल्याने, नारळाची उपलब्धता कमी झाली आहे. व्हर्जिन ऑइल काढणे आणि इतर प्रक्रिया उद्योगांमुळे त्या परिसरातील नारळ स्थानिक बाजारात विक्रीसाठी येत नाहीत, असे सावंतवाडीतील नारळ विक्रेते अरुण वझे यांनी सांगितले.
अरुण वझे यांच्या मते, “नारळाचे दर वाढले असले तरी, मागणी कमी झालेली नाही. नारळ जेवणाची चव वाढवतो, त्यामुळे ग्राहक ते विकत घेतातच. परंतु उत्पादन कमी झाल्यामुळे मागणीनुसार पुरवठा करणे शक्य होत नाहीये. हवामानातील बदल आणि माकडांच्या त्रासामुळे उत्पादनावर परिणाम झाल्याचे उत्पादक शेतकरी सांगतात.”
या सर्व कारणांमुळे सणासुदीच्या काळात नारळाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. लहान नारळाचा दर २० ते २५ रुपयांपासून सुरू होतो, तर सर्वात मोठ्या नारळासाठी ५० ते ६० रुपये मोजावे लागतात.
नारळ महागले असल्याने घर चालविणाऱ्या गृहिणींची दमछाक होत आहे. महिन्यांचे घर खर्चाचे अंदाजपत्रक वाढले आहे. सणासुदीचे दिवस सुरू झाल्याने देव कार्यासाठी देखील नारळ हमखास लागतो. त्यामुळे भक्तांना तो खरेदी करताना चिंता असते. तरीही घर आणि देशासाठी नारळ खरेदी करताना ग्राहक हात आखडता घेत नाहीत. त्यामुळे नारळाचे भाव चांगलेच वाढले आहेत.
.. नारळाचं वन्य प्राण्यांकडूंन नुकसान! नारळ परिपक्व होत असताना लाल तोंडाची माकडं, शेकरू पासून नुकसान होत आहे. त्याला आळा घालण्यासाठी शासकीय पातळीवर कोणतीही योजना नाही. लाल तोंडाची माकडं झुंडीने येऊन नुकसान करतात