जिल्ह्य़ातील बाभळवाडी या छोटय़ाशा गावात पूर्वी सरपंचपद निवडीच्या वेळी झालेल्या राडय़ापासून दोन गटांत धुमसत असलेला वाद शनिवारी पुन्हा एकदा उफाळून आला. या वादाचे पर्यवसान सकाळी तलवारबाजीत झाले. सिमेंट रस्त्याच्या कारणावरून दोन गटांत झालेल्या सशस्त्र मारामारीत सहा महिलांसह १५ जण जखमी झाले. यातील पाचजणांची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकारानंतर राष्ट्रवादी, शिवसेनेचे पदाधिकारी व पोलीस अधिकारी गावात दाखल झाले.
बीड तालुक्यातील बाभळवाडीची ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहे. राष्ट्रवादी किसान सेलचे जिल्हाध्यक्ष परमेश्वर सातपुते यांच्या सरपंच निवडीच्या वेळी गावात पूर्वी राडा झाला होता. सातपुते यांचा व शिवसेनेचे कार्यकत्रे अशोक फिरंगे यांचा परस्परविरोधी गट आहे. छोटय़ा-मोठय़ा कारणावरून वाडीत कायम वाद धुमसत असतो. सिमेंट रस्त्याच्या कामावरून दोन दिवसांपूर्वी पेटलेला वाद सातपुते यांच्या पुढाकाराने मिटवण्यातही आला होता. मात्र, शनिवारी सकाळीच गाव पातळीवरील दोन्ही गटांचे कार्यकत्रे तलवारी काढून एकमेकांवर तुटून पडले. तब्बल तासभर सुरू असलेल्या सशस्त्र हाणामारीत दोन महिलांसह तब्बल १५जण रक्तबंबाळ झाले.
जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यात भास्कर सातपुते, अभिमान सातपुते, गनुभाऊ सातपुते, सुनंदा सातपुते, कविता सातपुते आदींचा समावेश आहे. यातील पाचजणांची प्रकृती चिंताजनक आहे. घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादी, शिवसेनेचे पदाधिकारी यांच्यासह पोलीस अधिकारी गावात दाखल झाले. गावात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fight between ncp shivsena in babhali
First published on: 24-05-2014 at 02:02 IST