परभणी लोकसभा मतदारसंघात १७ उमेदवार असले, तरी खरी लढत दोनच उमेदवारांमध्ये आहे. १९८९ पासून हा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात आहे. या वेळी उमेदवारीसाठी अर्धा डझन दावेदार सेनेकडे होते. परंतु आक्रमक आमदार अशी ओळख असलेल्या संजय जाधव यांना सेनेने बढतीची संधी दिली. राष्ट्रवादीनेही विजय भांबळे यांच्यासारख्या तरुण कार्यकर्त्यांला मदानात उतरविले. या दोन्ही उमेदवारांचे राजकीय अस्तित्व या निवडणुकीत पणाला लागले आहे.
निवडणुकीत जिल्ह्याच्या विकासाचे प्रश्न चर्चिले जावेत, कामाच्या जोरावर मते मागितली जावीत व आपले संकल्प काय, तेही उमेदवारांकडून मतदारांसमोर जाहीरनाम्याच्या रुपाने यावे, अशी अपेक्षा होती. पण तसे काही घडले नाही. आपच्या सलमा कुलकर्णी व भाकपचे राजन क्षीरसागर यांनी आपली भूमिका पत्रकांच्या माध्यमातून मतदारांपर्यत पोहोचवली. या पद्धतीने राष्ट्रवादी व शिवसेनेच्या उमेदवारांनी आपली भूमिका, संकल्प, स्वतच्या नजरेतील विकासाचा आराखडा मतदारांसमोर मांडला नाही. शेवटच्या टप्प्यात दोन्ही बाजूंनी व्यक्तिगत पातळीवरही प्रचाराचा प्रयत्न झाला. भांबळे यांच्या उमेदवारीसाठी ज्यांचा पक्षांतर्गत विरोध होता त्यातल्या अनेकांनी काम सुरू केले, पण काहींनी केवळ व्यासपीठावर हजेरी लावून आतून मात्र विरोध करण्याचे काम सुरू ठेवले. आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांचा विरोध दूर करण्याचे सर्व प्रयत्न राष्ट्रवादीने केले, पण विरोधाची धार कमी झाली नाही उलट शेवटच्या टप्यात ती वाढली. आता खऱ्या अर्थाने या दोन प्रमुख उमेदवारांमध्ये निकराचा संघर्ष आहे.
या निवडणुकीतील वैशिष्टय़ म्हणजे राष्ट्रवादीसोबत काँग्रेसचे कार्यकत्रे एकदिलाने काम करताना दिसले. बोर्डीकर यांचा अपवाद वगळता मतदारसंघातील काँग्रेसही भांबळे यांच्या पाठीशी दिसली. या आधी सलग तीन निवडणुका सुरेश वरपूडकर घडय़ाळाच्या चिन्हावर हरले आहेत. वरपूडकरांना काँग्रेसचा आतून मोठय़ा प्रमाणात विरोध दिसत असे. दुसऱ्या फळीचे व गावपातळीवरील कार्यकत्रेही वरपूडकर यांच्या प्रचारयंत्रणेशी स्वतला जोडून घेताना दिसत नव्हते, या वेळी ते दिसत आहेत. भांबळेंचा संपर्क व १० वर्षांपासून त्यांच्याकडे कोणतीही आमदारकी अथवा अन्य पद नसताना त्यांचे काम ही जमेची बाजू होती, तर संजय जाधव यांची आक्रमक आमदार ओळख व जोडीला नरेंद्र मोदी यांची लाट या जमेच्या बाजू ठरल्या. आघाडी सरकारविरुद्ध असंतोष हीसुद्धा जाधव यांच्यासाठी जमेची बाजू आहे.
परभणी मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, बालेकिल्ल्याचा बराचसा डोलारा दोन्ही काँग्रेसचे भांडण व हेव्या-दाव्यामुळे सावरला जातो. आमदार बोर्डीकर व सीताराम घनदाट या दोघांची या वेळी बालेकिल्ल्याला रसद होती. ती मतदानात कितपत परावर्तित होईल, हे येणारा काळ सांगणार आहे. ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली, असे मात्र खात्रीने म्हणता येऊ शकते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fight of sanjay jadhav vijay bhambale
First published on: 17-04-2014 at 01:45 IST