साध्या वेशात डय़ुटी का करतो या कारणावरून राहाता पोलीस ठाण्यातील नाईक व कोपरगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांच्यात शिवीगाळ, बाचाबाची होऊन दोघांचाही राग अनावर झाल्याने या दोघांनीही एकमेकांच्या श्रीमुखात लगावल्या. राहाता पोलीस ठाण्यात मंगळवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. त्याने खळबळ उडाली आहे.
मंगळवारी रात्री कोपरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक साजन सोनवणे यांना उत्तर नगर जिल्ह्याची रात्रीची गस्त होती. त्यांनी मध्यरात्री दीड वाजता राहाता पोलीस ठाण्यास भेट दिली. या वेळी वायरलेस डय़ुटीवर पोलीस नाईक काकड हे साध्या वेशात होते. याबाबत जाब विचारताच दोघांमध्ये सुरुवातीला बाचाबाची झाली. या वेळी सोनवणे यांनी पोलीस नाईक काकड यांना शिवीगाळ केली. त्यामुळे दोघांमधील वातावरण एकदम बिघडले. शिवीगाळीला आक्षेप घेत काकड यांनी नियमानुसार कारवाई करा असे सांगताच सोनवणे यांच्यातील अधिकारी जागा झाला. त्यांनी लगेचच काकड यांच्या श्रीमुखात भडकावली. या प्रकाराने संतापलेल्या काकड यांनीही नंतर सोनवणे यांच्या श्रीमुखात भडकावली. उपस्थित ठाणे अंमलदाराने मध्यस्थी करून ही मारामारी सोडवली. रात्रीची वेळ असल्याने झालेल्या प्रकारावर पांघरूण टाकण्यात आले. मात्र सोनवणे यांनी पोलीस डायरीत या प्रकाराची नोंद घेतल्याने हा प्रकार उघडकीस आला.
सोनवणे यांनी राहाता पोलीस ठाण्याच्या डायरीमध्ये पोलीस कर्मचारी काकड याने आपल्याशी गैरवर्तन केले. त्याचा रिपोर्ट वरिष्ठांकडे सादर करावा अशी नोंद घेऊन त्याबाबत पोलीस नियंत्रण कक्षालाही त्यांनी त्याच वेळी कळवले. ख-या प्रकाराची नोंद मात्र त्यांनी पोलीस डायरीत घेतली नाही. या प्रकाराची शहरात चर्चा सुरू झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fighting between police officer employee
First published on: 19-06-2014 at 02:58 IST