काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. याप्रकरणी त्यांच्याविरोधात ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख वंदना डोंगरे यांनी राहुल गांधींविरोधात तक्रार दाखल केली होती.
सावरकरांविरोधातील वक्तव्यामुळे स्थानिक नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, असा आरोप डोंगरे यांनी केला आहे. महाराष्ट्राच्या मातीमध्ये आमच्या महापुरुषांची बदनामी सहन करणार नाही, असा पवित्रा डोंगरे यांनी घेतला आहे. त्यांच्या भूमिकेला शिंदेगटानेदेखील पाठिंबा दर्शवला आहे.
सावरकरांवरील टीकेवरून वाद; राहुल गांधींच्या विधानाशी उद्धव ठाकरे असहमत, भाजप-शिंदे गट आक्रमक
दरम्यान, राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी शिंदे गटाकडून ठाण्यात निषेध मोर्चा काढण्यात आला होता. गांधींविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी या मोर्चादरम्यान शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केली होती.
काय म्हणाले होते राहुल गांधी?
“सावरकर यांनी इंग्रजांना माफीनामा लिहून दिला होता. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल हे अनेक वर्षे तुरुंगात राहिले, पण त्यांनी कोणताही माफीनामा लिहिला नाही. सावरकरांनी घाबरल्यामुळेच माफीनाम्यावर सही केली. सावरकरांनी त्यावेळी एक प्रकारे स्वातंत्र्यलढ्यातील इतर नेत्यांना दगा दिला”, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. “मी तुमचा नोकर राहू इच्छितो”, असे सावरकर यांनी पत्रात म्हटल्याचेही राहुल गांधी यांनी अधोरेखित केले होते.