दापोलीतील रिसॉर्ट प्रकरणात ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ४२० अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे, अशी माहिती भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ट्विटद्वारे दिली आहे. या प्रकरणात रत्नागिरीतील दापोली पोलीस ठाण्यात सोमय्या यांच्यासह आणखी काही जणांवरही एफआयआर दाखल करण्यात आला आहे. दापोली रिसॉर्टच्या जमीन खरेदी व्यवहारात आणि बांधकामात अनियमितता झाल्याचा आरोप सोमय्या यांच्याकडून करण्यात आला होता.
रिसॉर्ट पाडण्याबाबत सोमय्यांचा इशारा
“अनिल परब यांचं दापोलीतील ‘साई’ रिसॉर्ट ९० दिवसांत पाडण्यात येईल. यासाठी नऊ सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. पुढच्या आठवड्यात ठेकेदाराची नियुक्ती होईल” असं विधान किरीट सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. त्यानंतर आता अनिल परब यांच्यावर या प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे.
नेमकं प्रकरण काय?
अनिल परब यांच्या दापोलीतील रिसॉर्टच्या जमीन खरेदी व्यवहारात गैरव्यवहार झाल्याचा आरोप सोमय्यांकडून सातत्यानं करण्यात येत आहे. या रिसॉर्टच्या आर्थिक व्यवहाराचा उल्लेख अनिल परब यांनी चार वर्षांपूर्वी जुलै २०१८ मध्ये झालेल्या विधान परिषद निवडणुकीच्या शपथपत्रात केला होता. या रिसॉर्टच्या वीज जोडणीसाठी अर्ज करतानाच त्यांनी घरपट्टीही भरली होती, असा दावा किरीट सोमय्यांनी केला आहे. दरम्यान, या आरोपानंतर ईडीकडून अनिल परब यांची चौकशी सुरू आहे. या रिसॉर्टशी काहीही संबंध नसल्याचं परब यांनी सांगितलं आहे. याप्रकरणी किरीट सोमय्या यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा केला असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.