जेएनयूतील विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात विद्यार्थ्यांसह विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्तींनी सहभाग नोंदवला होता. यात राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडही सहभागी झाले होते. जितेंद्र आव्हाड यांच्या सहभागावर भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी आक्षेप घेत तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जेएनयूमध्ये शांतता बैठक सुरू असताना काही गुंडांनी विद्यापीठात घुसून विद्यार्थ्यांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात विद्यार्थ्यांसह प्राध्यापकही जखमी झाले. गुंडांनी विद्यार्थी वसतिगृहासह साहित्याचेही नुकसान केलं. या घटनेनंतर देशातील इतर शहरांमध्ये याविरोधात निषेधाची प्रतिक्रिया उमटली. जेएनयूतील हल्ल्याचा निषेध करण्यासाठी मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात विद्यार्थी, कलाकारांसह राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे सहभागी झाले होते.

गेट वे ऑफ इंडियाजवळ झालेल्या आंदोलनात ‘काश्मीर को चाहिए आझादी’ अशा घोषणा देण्यात आल्याचा आरोप भाजपानं केला होता. भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनीही यावर आक्षेप घेतला. किरीट सोमय्या यांनी याप्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. “ठाकरे सरकारमधील मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली अवैध आणि देशविरोधी ‘काश्मीर को चाहिए आझादी’ अशा घोषणा देण्यात आल्या. हे आंदोलन करण्यासाठी पोलिसांनी परवानगी दिली नव्हती. तरीही हे आंदोलन करण्यात आलं असून, मंत्र्यांविरोधात कारवाई करण्यात यावी,” अशी मागणी सोमय्या यांनी तक्रारीत केली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, तक्रारीनंतर कुलाबा पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती सोमय्या यांनी ट्विट करून दिली आहे.