औरंगाबादच्या जालना रोडवर असलेल्या साजन-सरिता एन एक्स या दुकानाला आज सकाळी आग लागली. या आगीमध्ये सुमारे ३० लाखांचे नुकसान झाले. इनव्हर्टरमधील शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली आहे. मराठवाडा आणि औरंगाबादमध्ये सरिता एन एक्स हे दुकान प्रसिद्ध आहे. सकाळी या दुकानातून धूर येत असल्याचे पाहून आजूबाजूच्या लोकांनी ही माहिती दुकानाचे मालक अंकुश पारसवाणी यांना कळवली. त्यानंतर लगेच अग्निशमन दलाने अर्धा तास प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणली.
या दुकानाजवळच असलेल्या गोदामातही बराच माल होता जो धुरांच्या लोळांमध्ये अडकला होता. दुकानाला आग लागली असताना धुराचे आणि आगीचे प्रचंड लोळ बाहेर येत होते, त्यामुळे आत कसे शिरायचे हा प्रश्न अग्निशमन दलाच्या जवानांना पडला. अखेरील काचा फोडून जवानांनी आत प्रवेश केला आणि ही आग विझवली. या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र सुमारे ३० लाख रूपयांचा माल जळून खाक झाला. यानंतर दुपारपर्यंत गोदामातला माल काढण्याचे काम सुरू होते.
सुमारे ३० लाख रूपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होतो आहे, खरे नुकसान किती झाले हा आकडा पूर्ण तपासणीनंतरच कळेल असे दुकानाचे मालक पारसवाणी यांनी म्हटले आहे. आग लागलेली असताना, ती विझवत असताना बघ्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.