औद्योगिक कारखाने, हॉटेल्स व रिसॉर्टमध्ये सारेच वाऱ्यावर

रायगड जिल्ह्य़ात २०१४ मध्ये अलिबाग तालुक्यातील एका फटाका कारखान्याला लागलेल्या आगीत ११ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला होता. यानंतर रायगड जिल्ह्यातील औद्योगिक सुरक्षेचा मुद्दा प्रकर्षांने समोर आला. कंपन्यामधील सुरक्षात्मक उपाययोजनांमधील त्रुटी आणि त्यांच्या अमंलबजावणीकडे प्रशासनाचे होणार दुर्लक्ष या निमित्ताने समोर आले. मुंबईतील कमला मिल कंपाऊंड दुर्घटनेच्या पाश्र्वभूमीवर या सर्व जिल्ह्यातील औद्योगिक कारखान्यांचे फायर सेफ्टी ऑडिट योग्य प्रकारे होते की नाही हे तापसणे गरजेचे आहे.

रायगड जिल्हा हा राज्याचा औद्योगिक जिल्हा म्हणून जाहीर झाला आहे. गेल्या दोन दशकात येथे मोठय़ा प्रमाणात औद्योगिकीकरणाला सुरवात झाली आहे. महाड, रोहा, पाताळगंगा, नागोठणे येथे मोठय़ा प्रमाणात रासायनिक कंपन्या उभ्या राहिल्या आहे. अलिकडच्या काळात खालापूर, पेण आणि माणगाव येथे महाकाय औद्योगिक प्रकल्प उभे राहिले आहेत. कमला मिल कंपाऊंड दुर्घटनेच्या पाश्र्वभूमीवर या सर्व कंपन्यांच्या औद्योगिक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाटय़ावर आला आहे.

रायगड जिल्ह्य़ातील अलिबाग येथील अनंत फायर वर्क्‍स या फटाक्यांच्या कारखान्याला २०१४ मध्ये भीषण आग लागली होती. यात ११ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला होता. तर २० जण गंभीररीत्या जखमी झाले होते. या दुर्घटनेनंतर जिल्ह्य़ातील औद्योगिक सुरक्षा आणि आगरोधक यंत्रणांमधील त्रुटी प्रकर्षांने समोर आल्या होत्या. फटाका कारखान्यात सक्षम आगरोधक यंत्रणाच अस्तित्वात नव्हती, कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. नागरीवस्तीत अत्यंत धोकादायक परिस्थितीत हा कारखाना चालवला जात होता. सुरक्षात्मक उपाययोजनाकडे दुर्लक्ष केल्याने ही दुर्घटना घडली आणि ११ कामगारांचा जीव गेला. जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन काल्रेिखड परिसरात सुरू असलेले चारही फटाका कारखाने बंद करण्याचे निर्देश दिले होते. यानंतर २०१५ मध्ये खोपोली येथील सिलिकॉन कंपनीला भीषण आग लागली होती. या संपूर्ण कंपनी जळून खाक झाली. २०१७ मध्ये महाड एमआयडीसीतील ओंकार केमिकल्स कंपनी जळून खाक झाली. याच वर्षी महाड एमआयडीसीतील आपटे ऑरगॅनिक्स कारखान्याला शॉर्टसर्ट झाल्याने आग लागली. एप्रिल २०१७ मध्येच मुंबई-गोवा महामार्गावर गडबजवळ असणाऱ्या जॉन्सन टाईल्स कंपनीला आग लागली. बीएसआर डिपार्टमेंटमध्ये लागलेल्या या आगीवर नियंत्रण आणण्यासाठी तब्बल चार तासांचा कालावधी लागला. सुदैवाने या सर्व घटनामध्ये जीवित हानी झाली नाही. पण सातत्याने होणाऱ्या या दुर्घटनामुळे औद्योगिक सुरक्षेचा मुद्दा प्रकर्षांने समोर आला आहे.

आग प्रतिबंधक उपाय योजण्याची गरज

  • औद्योगिकरणाबरोबरच रायगड जिल्ह्य़ात नागरीकरणही वाढत चालले आहे. जागा दिसेल तिथे बांधकाम उभी राहत आहेत, अलिबाग, पेण, खोपोली, कर्जत, उरण यासारख्या परीसरात सात मजली इमारती बांधण्यास आता परवानगी देण्यात आली आहे.
  • ज्या प्रमाणात शहरीकरण होत आहे, त्या प्रमाणात अग्नीशमन यंत्रणांचे सक्षमीकरण अद्याप झालेले नाही. एखादी दुर्घटना घडल्यास काय, असे प्रश्न त्यातून निर्माण होतात. रायगडमध्ये अलीकडे हॉटेल व्यवसाय आणि रिसॉर्ट मोठय़ा प्रमाणावर उभी राहिली.
  • मुंबईच्या जवळ असल्याने सुट्टय़ांच्या काळात या परिसरातील सारी हॉटेल्स गजबजून जातात. बहुतांशी हॉटेल्स किंवा सिसॉर्टमध्ये आग प्रतिबंधक किंवा सुरक्षेचे उपाय योजण्यात आलेले नाहीत.