निवडणूक आयोगाने अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या बंडखोर शिंदे गटाला ढाल-तलवार हे पक्षचिन्ह दिलं आहे. त्यामुळे आता ठाकरे आणि शिंदे गटात मशाल विरुद्ध ढाल-तलवार अशी लढत होणार हे स्पष्ट झालं आहे. आयोगाने ढाल-तलवार हे पक्षचिन्ह दिल्यानंतर शिंदे गटाकडून भरत गोगावले यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. तसेच तलवार जनतेचं रक्षण करण्यासाठी, तर तलावर अंगावर येणाऱ्या शत्रूसाठी असल्याचं म्हटलं. ते मंगळवारी (११ ऑक्टोबर) एबीपी माझाशी बोलत होते.

भरत गोगावले म्हणाले, “हे अगदी परफेक्ट पक्षचिन्ह आहे. मराठी माणसाला दुसरं काय पाहिजे. आता आमची ढाल तलवार कशी चमकते ते बघा. ढालीने जनतेचं रक्षण करायचं आणि शत्रू अंगावर आला तर तलावर समोर धरायची. शिवाजी महाराजांच्या काळापासून ढाल तलवार आहे.”

शंभुराजे देसाई काय म्हणाले?

शंभुराजे देसाई म्हणाले, “आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाला तीन चिन्हांचे पर्याय दिले होते. त्यापैकी आम्हाला ढाल-तलवार हे चिन्ह मिळालं आहे. आम्ही याचं स्वागत करतो. या ढाल तलवारीचा वापर हिंदवी स्वराज्य स्थापन करताना छत्रपती शिवाजी महाराजांनी केला. ती ढाल तलवार अन्याय अत्याचार करणाऱ्यांविरोधात वापरली. ते प्रतिक आम्हाला मिळालं याचा आम्हाला सर्वस्वी आनंद आहे.”

“बाळासाहेब ठाकरे दसरा मेळाव्यात तलवारीचं पुजन करत होते. त्यातलीच ढाल तलवार आम्हाला मिळाली आहे. त्यामुळे चिन्हाच्या रुपाने आम्हाला बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद मिळाला आहे. हे चिन्ह सामान्य माणसापर्यंत पोहचवण्याचं काम आम्ही नक्की करू,” असंही शंभुराजे देसाई यांनी नमूद केलं.

संदीपान भुमरे काय म्हणाले?

संदीपान भुमरे म्हणाले, “आम्ही निवडणूक आयोगाच्या निर्णयावर समाधानी आहोत. त्यामुळे आता आम्ही ढाल तलवार घेऊन जनतेसमोर जाऊ.”

हेही वाचा : विश्लेषण : उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंना ‘त्रिशूळ’ हे पक्षचिन्ह का मिळालं नाही?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ही बाळासाहेबांची शिवसेना, ती उद्धव सेना – किरण पावस्कर

किरण पावस्कर म्हणाले, “शिवसेना म्हटलं की तलवारीची गरज आहे आणि ढालीचीही गरज आहे. ढाल तलवार हे चिन्ह जुनं आहे. ते आम्हाला मिळणं हा शुभ संकेत आहे. आम्हाला मिळालेलं नाव बाळासाहेबांची शिवसेना असं आहे. ही बाळासाहेबांची शिवसेना आहे. दुसरीकडे ती उद्धव सेना आहे. “