मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू केलेलं बेमुदत उपोषण आज (१४ सप्टेंबर) १७ व्या दिवशी सोडलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जालन्यात येऊन जरांगे यांच्याशी चर्चा केली आणि त्यानंतर शिंदेंच्या हस्ते फळांचा रस घेत जरांगेंनी उपोषण सोडलं. यानंतर उपस्थितांसमोर बोलताना मनोज जरांगेंनी पहिली प्रतिक्रिया दिली.

मनोज जरांगे पाटील म्हणाले, “राज्यातील ही पहिली घटना आहे म्हणून कौतुक करायला हवे. आतापर्यंत जे कधीच घडलं नाही, ते आज घडलं. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः मराठा आरक्षणाच्या विषयात लक्ष घालून आमरण उपोषण सोडवायला जालन्यात आले. त्यांचे मराठा समाजाच्या वतीने त्यांचं टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत.”

“मराठा समाजाला न्याय देऊ शकणार असेल, तर फक्त एकनाथ शिंदे”

“या टाळ्यांचा विजय होईल हा शब्द देतो. तुमची टाळी वाया जाणार नाही. मी २९ ऑगस्टला आंदोलन सुरू झालं तेव्हापासून प्रत्येकवेळी सांगत होतो की, मराठा समाजाला न्याय देऊ शकणार असेल, तर फक्त एकनाथ शिंदे,” असं मत मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केलं.

व्हिडीओ पाहा :

हेही वाचा : “आरक्षण घेतल्याशिवाय सोडणार नाही, एवढं…”; मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीआधी मनोज जरांगेंचं वक्तव्य

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“शिंदेंनी आरक्षण दिल्याशिवाय मागे हटणार नाही असं सांगितलं”

“मला माझा समाज प्रिय आहे हे मी आधीपासून सांगत होतो. समाजाच्या हिताचा निर्णय घेईन आणि त्याशिवाय मागे हटणार नाही हे मी प्रत्येकवेळी सांगितलं आहे. तीच भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आहे. त्यांनीही आरक्षण दिल्याशिवाय मागे हटणार नाही, असं सांगितलं आहे,” असंही मनोज जरांगेंनी नमूद केलं.