जिल्हय़ात एकाच दिवसांत पाच जणांचा मृत्यू व २७ नव्या रुग्णांची नोंद शनिवारी झाली. आतापर्यंत ६४ जणांचा मृत्यू झाला असून, जिल्हय़ातील एकूण रुग्ण संख्या ११६३ झाली. जिल्हय़ात गत १५ दिवसांत ३० करोनाबाधितांचे बळी गेलेत. दररोज सरासरी दोन जणांचा मृत्यू होत असल्याने खळबळ उडाली आहे.

जिल्हय़ात करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वेगाने वाढले. करोनाबाधित रुग्णांचे मृत्यू रोखण्यात अपयशच आले आहे.  ६ ते २० जूनपर्यंत १५ दिवसांत ३० बाधित दगावले आहेत. १४ जून रोजीही पाच रुग्णांचा मृत्यू झाला होता.

जिल्हय़ातील एकूण ३२३ तपासणी अहवाल आज प्राप्त झाले. त्यापैकी २९६ अहवाल नकारात्मक, तर २७ जणांचे अहवाल सकारात्मक आले आहेत. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या ११६३ वर पोहचली. सध्या रुग्णालयात ३४७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, शहरातील अकोट फैल शंकर नगर येथील रहिवासी ६३ वर्षीय पुरुष व गुलजारपुरा येथील ६२ वर्षीय पुरुष रुग्णाचा आज मृत्यू झाला. दोन्ही रुग्ण १६ जून रोजी दाखल झाले होते. पातूर येथील ३५ वर्षीय महिलेचाही मृत्यू झाला असून त्यांना १५ जून रोजी दाखल दाखल करण्यात आले होते.

शहरातील मोठी उमरी येथील ५५ वर्षीय रुग्णाला ८ जून रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना पुढील उपचारासाठी खासगी ओझोन रुग्णालयात १४ जून रोजी पाठविण्यात आले. त्याठिकाणी त्यांचा आज मृत्यू झाला. तर अकोट अकबर प्लॉट येथील ७५ वर्षीय पुरुष रुग्णाचा १९ जून रोजी रात्री मृत्यू झाला. त्यांना ५ जून रोजी दाखल करण्यात आले होते. या एकूण पाच मृत्यूची नोंद आज झाली.

आज दिवसभरात २७ जणांचे अहवाल सकारात्मक आले. सकाळी प्राप्त अहवालात २५ रुग्ण आढळले आहेत. त्यात नऊ महिला व १६ पुरुष आहेत. त्यात आदर्श कॉलनी येथील चार, शंकर नगर, अशोक नगर, न्यू साई नगर, जुने शहर येथील प्रत्येकी दोन, तर रामदास पेठ, अकोट फैल, बोरगांव मंजू, मुकुंद वाडी, हरिहरपेठ, हैदरपूरा, कच्ची खोली, खदान, शास्त्री नगर, गायत्री नगर, सोनटक्के प्लॉट, सिंधी कॅम्प व बुलढाणा येथील रहिवासी प्रत्येकी एक रुग्ण आहे. शनिवारी सायंकाळी जवाहर नगर व जठारपेठ येथील प्रत्येकी एक रुग्णाची भर पडली.

साडेसातशेवर रुग्णांची करोनावर मात

अकोला जिल्हय़ात आतापर्यंत ७५२ रुग्णांची करोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. त्यात शनिवारी दुपारनंतर रुग्णालयातून सोडण्यात आलेल्या १० जणांचा समावेश आहे. त्यातील सहा जणांना घरी पाठवण्यात आले तर उर्वरित चार जणांना कोविड केअर सेंटर येथे निरीक्षणात ठेवण्यात आले आहे.

७१७८ अहवाल नकारात्मक

जिल्हय़ातील एकूण ८३४४ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ८०२२, फेरतपासणीचे १३४ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १८८ नमुने होते. आजपर्यंत एकूण ८३४१ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण नकारात्मक अहवालांची संख्या ७१७८, तर सकारात्मक अहवाल ११६३ आहेत.