अलिबाग :  पोलीस कर्मचाऱ्यांस मद्यप्राशन करून मारहाण करणे पाच जणांना चांगलेच महागात पडले आहे. अलिबाग सत्र न्यायालयाने या सर्वाना एक वर्ष सक्त मजूरीची शिक्षा सुनावली आहे. रमेश डफळ, बबन डफळ, सुभाष वेळकर, अक्षय गायकवाड, आतिष गायकवाड अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हे सर्व जण पुणे जिल्ह्यातील हवेली येथील रहिवाशी आहेत.ही घटना ६ एप्रिल २०१९ रोजी काशिद मुरुड येथे घडली होती. हे पाचही जण काशिद समुद्र किनाऱ्यावर मद्यप्राशन करत बसले होते. यावेळी समीर परशुराम म्हात्रे पोलीस हवालदार काशिद येथे बंदोबस्तावर होते. त्यांनी पाचही जणांना सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करण्यास मनाई असल्याचे सांगितले. याचा राग येऊन आरोपींनी पोलीस हवालदार समीर म्हात्रे यांना शिवीगाळी करून धक्काबुक्की केली. म्हात्रे यांनी या घटनेचे चित्रिकरण मोबाईलमध्ये करण्याचा प्रयत्न केला असता तो मोबाईल हिसकावून घेतला. या प्रकरणी मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपास करून अलिबाग सत्र न्यायालयात या प्रकरणी दोषारोपपत्र दाखल केले होते.  या प्रकरणाची सुनावणी तदर्थ जिल्हा व अतिरीक्त सत्र न्यायाधीश १ जयदीप मोहीते यांच्या न्यायालयात झाली. यावेळी अतिरिक्त सरकारी अभियोक्ता स्मिता धुमाळ पाटील यांनी काम पाहिले. सुनावणी दरम्यान एकूण आठ साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. यात फिर्यादी समीर म्हात्रे, तपासिक अमंलदार के पी साळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर गांगलवार, साक्षीदार सागर रसाळ, संतोष राणे यांच्या साक्षी महत्वपुर्ण ठरल्या. दोन्ही बाजूचे युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने पाचही आरोपींना भादवी कलम ३५३, १४९, ३३२, ५०४ सह पोलीस अधिनियम कलम ८५ अन्वये दोषी ठरविले आणि आरोपींना सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आणि दंडही ठोठावला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Five man gets one year jail for assaulting cop zws
First published on: 28-03-2022 at 02:58 IST