अहिल्यानगर : बिबट्याने पाच वर्षांच्या बालिकेवर हल्ला करून ठार मारल्याच्या घटनेने संतप्त झालेल्या खारेकर्जुने (ता. अहिल्यानगर) येथील ग्रामस्थांनी आज, गुरुवारी गाव बंद ठेवले. जोपर्यंत बिबट्या जेरबंद होत नाही, तोपर्यंत अंत्यविधी न करण्याचा निर्णय घेतला. जिल्हा परिषदेची प्राथमिक, तसेच गावातील माध्यमिक शाळाही बंद ठेवण्यात आली आहे.
खारेकर्जुने येथे काल, बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास शेतात शेकोटी करीत असताना तुरीच्या शेतातून आलेल्या बिबट्याने पाच वर्षीय रियांका सुनील पवार या मुलीला उचलून पलायन केले. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण पसरले होते. रात्रभर ग्रामस्थांनी या मुलीचा शोध घेतला. आज सकाळी येथील शाळेच्या मागील बाजूस हिंगणगाव रस्त्यालगत मुलीचा मृतदेह आढळला. या घटनेच्या निषेधार्थ आज खारेकर्जुने येथील ग्रामस्थांनी तातडीची बैठक बोलवली. बिबट्या जेरबंद होत नाही तोपर्यंत गाव, तसेच शाळा बंद ठेवण्याचा, मुलीचे पार्थिव ताब्यात न घेण्याचा, अंत्यविधी न करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला.
खारेकर्जुने येथे बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या मुलीच्या नातेवाइकांना शासकीय मदत मिळावी या मागणीचे निवेदन आज जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रताप शेळके व पंचायत समितीचे माजी उपसभापती डॉ. दिलीप पवार यांनी तहसीलदार संजय शिंदे यांना दिले.
नगर तालुक्यातील अनेक गावांमध्ये बिबट्याचा वावर वाढला आहे. हिंगणगाव, खातगाव, खारेकर्जुने, टाकळी, निमगाव, हमिदपूर आदी गावांच्या परिसरात बिबट्याचे दर्शन घडल्याचे नागरिक सांगतात. या सर्व परिसरात कामगारवर्ग, विद्यार्थी, शेतकरीवर्ग भीतिदायक परिस्थितीत आहे. परिसरात अनेक शाळा, तसेच महाविद्यालये असून, विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. वनविभाग दुर्लक्ष करत असून त्यांची यंत्रणा अपुरी पडत आहे. भविष्यात अशा दुर्घटना घडू नये यासाठी तत्काळ सर्व आवश्यक ठिकाणी पिंजरे लावून बंदोबस्त करावा अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा प्रताप शेळके, रामदास भोर, बी. डी. कोतकर आदींनी दिला आहे.
