बंद बाटलीबरोबरच मोठय़ा जारचा वापर करून शुद्ध पाणीविक्री व्यवसाय सध्या चांगलाच तेजीत आला आहे. या व्यवसायासाठी प्रशासनाकडे नियमावलीच नसल्याने जारचे पाणी शुद्ध आहे हे तपासायचे कोणी, असा प्रश्न अन्न व औषध विभागासमोर आहे. शहरात बीआयएसचा परवाना असलेले केवळ तिघेजण असले, तरी गल्लीबोळात पाण्याचा व्यवसाय बोकाळल्याने रोज लाखोंची उलाढाल बिनबोभाट सुरू आहे.
जिल्ह्य़ात पिण्याच्या पाण्याचे मोठे दुर्भिक्ष्य असले, तरी शहरात मात्र बाटलीबंद व जारचा व्यवसाय तेजीत आहे. तहान भागवण्यासाठी बंद बाटलीतील थंड पाणी पिण्याकडे अनेकांचा वाढता कल आहे. एक लिटर पाण्याच्या बाटलीचा भाव १० ते २५ रुपयांपर्यंत आहे. आता बंद बाटलीसह मोठय़ा जारमधील शुद्ध पाण्याचा व्यवसायही तेजीत आहे. दहा लिटर पाण्याचे जार ३० ते ३५ रुपयांना विकले जाते. शहरातील छोटय़ा-मोठय़ा कार्यालयापासून अनेक घरांपर्यंतही या जारच्या पाण्याचा पुरवठा होऊ लागला आहे. गल्लीबोळात जारच्या पाण्याचा व्यवसाय करणाऱ्यांनी दुकाने थाटली आहेत. मात्र, अन्न व औषध प्रशासन विभागाकडून केवळ तीनच व्यावसायिकांना परवाना दिल्याचे या कार्यालयाकडून सांगण्यात आले.
बीआयएस (ब्यूरो इंडियन स्टँडर्ड) परवाना असलेल्यांनाच या विभागाने परवानगी दिली. इतर व्यावसायिकांनीही या कार्यालयाकडे पाठपुरावा केला होता. परंतु त्यांच्याकडे बीआयएस नसल्यामुळे त्यांना परवाना देण्यात आला नाही. या व्यावसायिकांनी मात्र जारच्या पाण्याचा धंदा थाटला आहे. या पाण्याच्या व्यवसायासाठी प्रशासकीय विभागाकडे कोणतीच नियमावली नसल्याने कारवाई कोणी व कोणत्या कायद्याने करायची असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे पाणी व्यावसायिकांचा शुद्ध पाण्याचा धंदा बिनबोभाट सुरू आहे.