अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातून वाहणाऱ्या सिपना नदीला मुसळधार पावसामुळे पूर आला आहे. या पुरात धारणी तालुक्यातील दिया या गावातील एक युवक आज (रविवार) सकाळी वाहून गेला. कृष्णा कासदेकर (३५) असे पुरात वाहून गेलेल्या युवकाचे नाव आहे.

अनेक गावांचा संपर्क तुटला –

सिपना नदीच्या पुराचा प्रवाह प्रचंड असल्या मुळे या प्रवाहात नदीत वाहून गेलेल्या कृष्णा कासदेकर या युवकाचा शोध घेणे अतिशय कठीण असले तरी बचाव पथक घटनास्थळी रवाना झाले आहे. अमरावती जिल्ह्यात चांदूरबाजार तिवसासह मेळघाटात मुसळधार पाऊस कोसळत आहे. मेळघाटात मुसळधार पावसामुळे मेळघाटातून वाहणाऱ्या सिपनासह इतर सर्वच नद्यांना पूर आला असल्यामुळे मेळघाटातील धारणी आणि चिखलदरा तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

गुराख्याचा शेतात असताना वीज पडून मृत्यू –

सर्वाधिक पाऊस धामणगाव रेल्वे तालुक्यात झाला. त्यामुळे या तालुक्यातील बोरगाव निस्ताने, सोनोरा काकडे, गोकुळसरा, दिघी महल्ले या गावाबाहेर असलेल्या पुलावरून पाणी असल्याने या ४ गावांचा संपर्क सकाळी तुटला होता. त्यामुळे महसूल आणि पोलीस प्रशासन परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत. याच दरम्यान नागापूर येथील बाबासाहेब दरेकर या गुराख्याचा शेतात असताना वीज पडून मृत्यू झाला आहे. याशिवाय विविध गावांतील ४३ नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे. मुसळधार पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी शेत जमिनी पाण्याखाली गेल्याने मोठे नुकसान झाले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या चोवीस तासांत सर्वाधिक ५७.२ मिमी पाऊस धामणगाव रेल्वे तालुक्यात झाला असून चिखलदरा तालुक्यात ४२.६, तर तिवसा तालुक्यात ४६.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.