मंदार लोहोकरे

चार मोठय़ा वारी असो की महिन्याची एकादशी; पंढरी नगरी टाळ मृदंगांचा जयघोष आणि भाविकांनी फुलून गेलेली असते. मात्र शनिवारी चैत्र एकादशी दिवशी ना भाविकांची गर्दी ना टाळ मृदंगांचा जयघोष कानी पडला. एरवी गर्दीने फुलून जाणारी चंद्रभागा तीर, भक्त पुंडलिक ही ठिकाणे तर ओस पडलेली होती. इतिहासात पहिल्यांदाच भाविकांविना पंढरीत चैत्री एकादशी पार पडली आहे.

‘माझ्या जीवाची आवडे पंढरपुरा नेईन गुढी’ असे म्हणत शेकडो वर्षांची वारकरी परंपरा जोपासत लाखो वैष्णव पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाला येत असतात. वारकरी संप्रदायात आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्र वारीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तसेच दर महिन्याच्या एकादशीला देखील भाविक पंढरीला दर्शनासाठी येतात. मात्र,सध्या करोनाचे संकट घोंघावत आहे. या पार्श्वभूमीवर पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर १७ मार्च रोजी भाविकांना दर्शनासाठी बंद केले. तर वारकरी पाईक संघ आणि महराज मंडळीनी चैत्र वारीसाठी राज्यातील भाविकांना पंढरीला येऊ नका असे आवाहन केले होते. तसेच श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने चैत्र वारी रद्द केल्याचे जाहीर केले.

या पार्श्वभूमीवर पंढरीत शनिवारी चैत्र एकादशीची औपचारिकता पूर्ण झाली. येथील श्री विठ्ठलची नित्यपूजा मंदिर समितीचे सदस्य आ. सुरजितसिंह ठाकूर यांनी, तर रुक्मिणी मातेची पूजा सदस्य संभाजी शिंदे यांनी केली. या वेळी रामभाऊ जांभूरकर या भाविकाने जवळपास १ लाख गुलाबाच्या फुलांची आकर्षक आरास केल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली. विशेष म्हणजे वर्षांतील दोन एकादशीला विठ्ठलाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जातो. कर्नाटकातील विजयनगरचा राजा कृष्णदेव याने पंढरीतील पांडुरंगाची मूर्ती नेली होती. संत एकनाथ महाराज यांचे पणजोबा संत भानुदास महाराज यांनी ही मूर्ती परत आणली, तो दिवस चैत्र एकादशी होता. त्यामुळे या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्याची परंपरा आहे.

वारकरी संप्रदायातील फडमालक, दिंडी मालक, मठप्रमुखांनी या कठीण काळात लाखो वारकऱ्यांचे आरोग्यहित आणि प्रशासनावरील ताण लक्षात घेत ही यात्रा भाविकांविना साजरी केली. देशाच्या इतिहासात वारकरी संप्रदायाने राष्ट्रहिताच्या पुढे कुठलाही अनाठायी अट्टाहास न करता केलेला हा अपूर्व त्याग कधीच विसरता येणार नाही.

— रामकृष्ण हनुमंत महाराज वीरराष्ट्रीय प्रवक्ता,

वारकरी संप्रदाय पाईक संघ.