ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात ११ मे रोजी ‘डेक्कन ओडिसी’ या पंचतारांकित रेल्वे गाडीने ४४ विदेशी पर्यटकांचे आगमन होत आहे. त्यांच्या स्वागतासाठी ताडोबा व्यवस्थापन आंतरराष्ट्रीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने नियोजन करीत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चंद्रपूर जिल्ह्य़ात शहरापासून ४५ कि.मी.वर पट्टेदार वाघांसाठी देशविदेशात प्रसिध्द असलेला आंतरराष्ट्रीय दर्जाचा ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प ६२५.०४ चौ.कि.मी. क्षेत्रात वसलेला आहे. हा व्याघ्र प्रकल्प म्हणजे मध्य भारतातील निसर्ग, घनदाट अरण्य आणि वन्यजीवांचे अव्दितीय आश्रयस्थळ आहे, तर बफर झोनचे ११ चौ.कि.मी.चे जंगलही पर्यटकांना आकर्षित करीत आहे. गेल्या वष्रेभरात ताडोबाला सुमारे दीड लाख पर्यटकांनी भेट दिलेली आहे. हा आकडा दिवसागणिक वाढतच आहे. विदेशी पर्यटकांचे ताडोबाबद्दलचे आकर्षण लक्षात घेता पंचतारांकित ‘डेक्कन ओडिसी’ ही रेल्वे गाडी सुरू करण्यात आली होती. मात्र, पर्यटकच मिळत नसल्याने ती दीड वर्षांपूर्वी बंद करण्यात आली होती, पण आता पुन्हा ‘डेक्कन ओडिसी’ ४४ विदेशी पर्यटकांसह ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात ११ मे रोजी दाखल होत आहे. ताडोबा प्रकल्पातील खुटवंडा येथील टायगर ट्रेल रिसॉर्टचे संचालक आदित्य धनवटे यांनी डेक्कन ओडिसीचा टूर आयोजित केलेला आहे.

ही पंचतारांकित रेल्वे मुंबई-एलोरा गुंफा-औरंगाबाद-पेंच-ताडोबा-अजिंठा-नाशिक-मुंबई, अशी राहणार आहे. डेक्कन ओडिसी चंद्रपूर रेल्वे स्थानकावर येताच येथून ४४ पर्यटकांना खास बसव्दारे ताडोबा प्रकल्पात नेण्यात येईल. तेथे दिवसभर या पर्यटकांनी व्याघ्र भ्रमंतीचा आनंद घेतल्यावर पुन्हा त्याच बसने रेल्वे स्थानकावर आणून सोडले जाणार आहे. यानंतर ही रेल्वे मुंबईकडे रवाना होईल. ४४ विदेशी पर्यटकांसाठी ताडोबा प्रकल्पात दोन कॅंटरचे आरक्षण, तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सर्व सुविधा पर्यटकांना मिळाव्यात, या दृष्टीने ताडोबा व्यवस्थापन कामाला लागले आहे. यासंदर्भात अधिक माहितीसाठी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक व मुख्य वनसंरक्षक डॉ.जे.पी. गरड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या माहितीस दुजोरा दिला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Foreign tourists will be coming in tadoba by deccan odyssey train
First published on: 03-05-2016 at 01:38 IST