राहाता : तालुक्यातील लोणी बुद्रूकमधील म्हस्के वस्ती येथे माजी मंत्री तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ज्येष्ठ संचालक आण्णासाहेब म्हस्के यांचे निवासस्थान असलेल्या शेतातील पिंजऱ्यामध्ये ९ ते १० वर्षे वयाची मादी बिबट्या जेरबंद करण्यात वनविभाग व प्राणिमित्रांना यश आले. गेल्या दोन महिन्यांपासून पिंजऱ्याला हुलकावणी देणारा बिबट्या जेरबंद झाल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला.
गेल्या काही महिन्यांपासून दोन बिबट्यांचा मुक्त संचार या परिसरात होता. पाळीव कुत्र्यांचा या बिबट्यांनी फडशा पाडल्याने डॉ. प्रमोद म्हस्के पाटील यांनी पिंजऱ्याची मागणी केली होती. त्यानंतर वनविभागाने पिंजरा उपलब्ध करून दिला. सुरुवातीला भक्ष्य म्हणून कोंबड्या ठेवल्या पण बिबट्याऐवजी मुंगसांनी ६ कोंबड्यांचा फडशा पाडला. म्हणून डॉ. प्रमोद म्हस्के यांनी बिबट्या जेरबंद करण्यासाठी भक्ष्य म्हणून एक शेळी खरेदी केली आणि दोन महिन्यांपासून रोज संध्याकाळी शेळी पिंजऱ्यात ठेवणे व सकाळी घरी आणणे तसेच पिंजऱ्याची जागा बदलणे असा उद्योग चालू होता. पण आज पिंजऱ्यातून शेळी बाहेर काढल्यानंतर दबा धरून बसलेल्या बिबट्याने झडप मारून शेळी ठार केली. परंतु कामगारांनी आरडाओरड केल्याने मृत शेळी सोडून बिबट्या शेजारच्या उसात पळून गेला.
या माहितीमुळे प्राणिमित्र विकास म्हस्के व वनरक्षक प्रतीक गजेवर घटनास्थळी गेले. मृत शेळीचा रीतसर पंचनामा करून ज्या ठिकाणी शेळी मारली त्या ठिकाणी पिंजरा लावून त्यात मृत शेळी ठेवली. आणि बिबट्या रात्रीची शिकार शोधत सकाळीच तेथे आला आणि अलगत पिंजऱ्यात घुसला व अडकला.
बिबट्या जेरबंद झाल्याची खात्री पटताच रमेश घोलप यांनी तत्काळ प्राणिमित्र विकास म्हस्के यांना माहिती दिली. घटनेची माहिती उपवनसंरक्षक अधिकारी धर्मवीर शालविठ्ठल, सहायक उपवनसंरक्षक अधिकारी गणेश मिसाळ, वनपरिक्षेत्र अधिकारी नीलेश रोडे, वनरक्षक प्रतीक गजेवर यांना माहिती देण्यात आली. वनरक्षक गजेवार घटनास्थळी येऊन पंचनामा करून पिंजरा हलविण्याची कार्यवाही केली. यावेळी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, डॉ नानासाहेब म्हस्के उपस्थित होते.
दरम्यान बिबट्या जेरबंद झाल्याची बातमी पसरताच बघ्यांची मोठी गर्दी जमली. ही गर्दी पांगवण्यासाठी प्रकाश दिघे, भारत म्हस्के, अजय बोधक, रमण म्हस्के, प्रवीण विखे, भूषण म्हस्के, गोकुळ म्हस्के, अर्जुन विखे, मधुकर म्हस्के, एकनाथ म्हस्के, डॉ मुसळे आदींनी मदत केली. एक बिबट्या जेरबंद झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांचे भीतीचे वातावरण कमी झाले असले तरी जेरबंद झालेल्या ठिकाणापासून ३०० फुटावर दुसऱ्या बिबट्याने दर्शन दिल्याने परिसरातील भीतीचे वातावरण कायम आहे. वनविभागाने या ठिकाणी परत पिंजरा लावावा, अशी स्थानिक नागरिकांनी मागणी केली आहे.