सातारा: वाई ते पाचगणी जाणाऱ्या रस्त्यावर पसरणी घाटात डोंगर माथ्यावर अज्ञाताने भरदिवसा लावलेल्या आगीमुळे वनसंपदा जळून खाक झाली. यामुळे वृक्षप्रेमींसह वाई तालुक्यातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पावसाळ्यापूर्वी पसरणी घाटातील डोंगर उतारावर वणवा लागू नये, अशी व्यवस्था अनेक ठिकाणी करण्यात आली होती. त्यामुळे अनेक भागांत वाढलेले गवत आहे. त्याला लागूनच नव्याने हिरवेगार गवत आणि हिरवागार खूपच चांगला निसर्ग या परिसरात आहे. मात्र अज्ञाताने या सुक्या गवताला आग लावली.

भर पावसाळ्याच्या दिवसात श्रावण महिन्यात वणवा लागल्याने पर्यावरणप्रेमींमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. पसरणी घाटाच्या प्रारंभास वनविभागाचे कार्यालय आहे. त्याच डोंगराच्या माथ्यावर वणवा लागल्याने पर्यावरणप्रेमींमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. पाचगणी महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणांसह प्रतापगड येथे पर्यटक जात असतात. वणव्यामध्ये सरपटणाऱ्या प्राण्यांसह पशुपक्ष्यांची घरटी, पशुपक्षी आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने वृक्षसंपत्ती जळून खाक होत असल्याने घाटातील डोंगर काळाकुट्ट झाल्याने वृक्षप्रेमींसह वाई तालुक्यातील जनतेमधून संतापाची लाट उसळली आहे.

दरम्यान दुपारी दोनच्या सुमारास डोंगरात वणवा लागला. साधारणपणे डिसेंबरनंतर वणवा लागण्याचा कालावधी असतो; परंतु भरपावसात वणवा लागल्याने वणवा लावणाऱ्यांचे हे संबंधित विभागाला मोठे आव्हान आहे. सायंकाळी पाचच्या दरम्यान आलेल्या पावसामुळे वणवा भिजल्याने मोठे नुकसान टळले तरी संबंधित विभागाने घाट परिसरात सतर्क राहून कारवाई करावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमींमधून होत आहे.