सोलापूर : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात मला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना पकडण्यास सांगितले होते. त्याचबरोबर ‘भगवा दहशतवाद’ सिद्ध करण्यासाठी त्या दृष्टीने मला खोटा तपास करण्यास सांगितल्याचा गौप्यस्फोट मालेगाव बॉम्बस्फोट तपासाशी संबंधित ‘एटीएस’चे तत्कालीन पोलीस निरीक्षक महिबूब मुजावर यांनी केला आहे.
२९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगाव शहरात झालेल्या भीषण बॉम्बस्फोट खटल्याचा आज निकाल लागला. यात साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, मेजर रमेश शिवाजी उपाध्ये, समीर शरद कुलकर्णी, सुधाकर ओंकारनाथ चतुर्वेदी, प्रसाद श्रीकांत पुरोहित, अजय एकनाथ राहीलकर आदींची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. या बॉम्बस्फोटात सहा निरपराध नागरिकांना जीव गमवावा लागला आणि शंभरपेक्षा अधिक व्यक्ती जखमी झाले होते.
मालेगाव बॉम्बस्फोटानंतर मूळ सोलापूरचे असलेले महिबूब मुजावर हे एटीएसचे तत्कालीन पोलीस निरीक्षक होते. ते म्हणाले की, मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचे प्रमुख तपास अधिकारी परमवीर सिंह यांनी मला, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना पकडण्याचे आदेश दिले होते. त्याचबरोबर ‘भगवा दहशतवाद’ हे सर्व खोटे असतानाही तो दाखवण्यासाठी मला खोटा तपास करण्यास सांगितल्याचा गौप्यस्फोट मुजावर यांनी केला आहे.
या प्रकरणातील अन्य आरोपी संदीप डांगे आणि रामजी कलसंग्रा यांची हत्या झाली होती. तरीही ते आरोपी जिवंत आहेत अशा पद्धतीने तपास करण्याचे आदेशही मला परमवीर सिंह यांच्यासह अन्य वरिष्ठांनी दिले होते. यामुळे संबंधित मृत आरोपी जिवंत असल्याचे दाखवून त्या दिशेने तपास करून त्यांची नावे दोषारोपपत्रात घातली. मी या सर्व गोष्टींना विरोध केला. चुकीचे काम करणार नाही, असे स्पष्ट केले. त्यामुळे माझ्यावर अनेक खोटे खटले दाखल केले. परंतु, माझी बाजू खरी असल्याने त्यातून मी निर्दोष मुक्त झाल्याचा दावाही मुजावर यांनी केला आहे.