सध्या देशात आणि राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. “राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख खासदार शरद पवार हे पंतप्रधानांना मदतीसाठी पत्र लिहितात. त्यांनी एखादं पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही लिहावं. कशा प्रकारे त्यांनी गरीबांना मदत केली पाहिजे. तसंच दुकानदारांना, फुटपाथवर बसणाऱ्यांना, छोट्या उद्योगांना कशाप्रकारे मदत केली पाहिजे याविषयी त्यांनी राज्य सरकारला पत्र लिहावं,” असं ते म्हणाले. “राज्य सरकारकडून कोणत्याही उपाययोजना होत नाहीत. त्यांच्याकडून केवळ राजकारण सुरु आहे,” असंही त्यांनी नमूद केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशात सर्वाधिक करोनाचे रुग्ण महाराष्ट्रात आहेत. परंतु राज्य सरकारकडून करोनाता योग्यरित्या सामना केला जात नाही. अनेकांना लोकांना उपचार मिळत नाहीत. एकीकडे ही अवस्था आहे तर दुसरीकडे शेतमाल पडून आहे. त्याची व्यवस्थादेखील राज्य सरकारने केलेली नाही. शेतकऱ्यांना बियाणं मिळत नाहीत, खतं मिळत नाही, शेतकऱ्यावर संकट आलं आहे, असंही फडणवीस म्हणाले.

सामान्य माणसाला रेशन मिळत नाही, घोटाळे सुरु आहेत. केंद्राने राज्याला पैसे देऊन ज्यांच्याकडे रेशन नाही त्यांना रेशन पुरवण्याच्या सूचना दिल्या आहेत. पण ज्यांच्याकडे कार्ड आहे त्यांनाच धान्य मिळत नाही, असंही ते म्हणाले. रुग्णांना अॅम्बुलन्सही मिळत नाही. त्याअभावी रुग्णांचे मृत्यू होत आहेत. आपण एक डॅशबोर्ड बनवून रुग्णालयातील जागा सांगू शकतो. त्यामुळे रुग्णांची हेळसांड थांबेल. आता हे उघड्या डोळ्याने पाहणे शक्य नाही, असंही फडणवीस म्हणाले.

सरकारला मदत करण्यास तयार

आम्ही सरकारला मदत करण्यास तयार आहोत. राज्य सरकारला जी मदत हवी असेल ती करु. त्यांनी आम्हाला सांगावं, आम्ही पाठिशी उभं राहू. मात्र मुख्यमंत्र्यांनी पहिली बैठकच दोन महिन्यांनी घेतली. आम्ही तर सहकार्य करायला तयारच आहोत, त्यामध्ये केवळ औपचारिकता नको. आमची मदत नको असेल तर त्यांनी उपाययोजना कराव्या, असंही ते म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former cm devendra fadnavis coronavirus condition in maharashtra ncp sharad pawar governor bhagatsingh koshyari jud
First published on: 19-05-2020 at 13:31 IST