नांदेड : किनवट-माहूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासोबतच राहिलेले कृतिशील नेते प्रदीप नाईक यांचे बुधवारी सकाळी हैदराबाद येथील खाजगी रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर दहेली तांडा (ता.किनवट) या त्यांच्या मूळगावी गुरूवारी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, स्नुषा-जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

प्रदीप नाईक यांच्या निधनाचे वृत्त बुधवारी सकाळी जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह अन्य पक्षीय नेत्यांनाही धक्का बसला. मागील २५ वर्षांहून अधिक काळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून राजकीय क्षेत्रात सक्रिय राहिलेल्या नाईक यांनी २००४ ते २०१९ पर्यंत किनवट विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. दहेली तांडा येथील सामान्य कुटुंबात त्यांचा जन्म झाला. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच त्यांनी आधी व्यवसायात पदार्पण केले. १९९९ साली पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढविणार्‍या नाईक यांच्या वाट्याला अपयश आले; पण या पराभवाने खचून न जाता ते मतदारसंघात सक्रिय राहिले आणि नंतर सलग तीनदा विजय प्राप्त करून तब्बल १५ वर्षे त्यांनी किनवट-माहूर भागाचे प्रतिनिधित्व केले.

हेही वाचा…अक्कलकोटजवळ मोटार आणि ट्रकच्या अपघातात चौघांचा मृत्यू , देवदर्शनासाठी गाणगापूरला जाताना काळाचा घाला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नाईक यांच्या निधनाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष खा.शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मुख्यमंत्री खा.अशोक चव्हाण, नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण, आ.भीमराव केराम यांच्यासह जिल्ह्यातील विविध पक्षांच्या नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत प्रदीप नाईक यांनी भाजपाच्या भीमराव केराम यांच्या विरुद्ध मोठ्या नेटाने लढत दिली. पण या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. राष्ट्रवादीच्या तुतारी या चिन्हाशी साधर्म्य असलेल्या पिपाणी या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढविणार्‍या एका अपक्ष उमेदवारास अपेक्षेपेक्षाही जास्त मते मिळाल्यामुळे नाईक यांना पराभव स्वीकारावा लागला. या पराभवाचा त्यांना धक्का बसला होता. त्यातूनच त्यांच्या प्रकृतीत चढ-उतार सुरू होते आणि अखेर नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.