केंद्र सरकारने २ हजारांची नोट बंद केली आहे त्याबाबत विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या मुद्द्यावर टीका केली आहे. नोटबंदीचा निर्णय जसा बालिशपणे घेतला गेला होता तसाच दोन हजार रुपयांची नोट बंद करण्याचा निर्णय बालिशपणे घेतला गेला आहे असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले आहेत पृथ्वीराज चव्हाण?

२०१६ मध्ये नोटबंदी करण्यात आली तेव्हा तीन मोठी उद्दीष्टं होती. पाकिस्तानचा दहशतवाद बंद होईल, भ्रष्टाचाराला आळा बसेल आणि काळा पैसा नष्ट होईल. यापैकी एकही उदीष्ट साध्य झालेलं नाही. मागच्या नोटंबदीच्या निर्णयामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तोंडघशी पडले आहेत. नोटबंदीचा निर्णय झाल्यानंतर जेव्हा लोकांना नोटा बदली करण्यासाठी रांगेत उभं रहावं लागलं तेव्हा देशभरात शेकडो लोकांचा मृत्यू झाला, तसंच बँकांबाहेर मोठ्या प्रमाणावर गर्दीही झाल्याचं आपण पाहिलं आहे असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केलं.

सरकारच्या एका निर्णयामुळे इतक्या मोठ्या लोकसंख्येला मोठा त्रास झाल्याचं उदाहरण माझ्यासमोर दुसरं नाही, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नोटबंदीमुळे भारतातील कमीत कमी १२० कोटी लोक प्रभावित झाल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काय आहे हे प्रकरण?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी (दि. १९ मे) दोन हजार रुपयांची नोट वितरणातून काढण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत आपल्याकडच्या दोन हजारांच्या नोटा बँकेतून बदलून घेता येणार आहेत. ८ नोव्हेंबर २०१६ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० च्या नोटा चलनातून बंद केल्या होत्या. त्यांच्या जागी नवीन ५०० आणि २००० च्या नव्या नोटा बाजारात आणण्यात आल्या होत्या. नोव्हेंबर २०१६ मध्ये २ हजारांची नोट बाजारात आली होती. आरबीआयने दिलेल्या प्रतिक्रियेनुसार २०१९ पासून २ हजारांच्या नोटांची छपाई बंद केली आहे.