सोलापूर पालिकेत महेश कोठे यांना रोखण्याचा काँग्रेसचा प्रयत्न फसला

सोलापूर महानगरपालिकेच्या दोन जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस आघाडीला दोन्ही जागा गमवाव्या लागल्या. तर भाजप-सेना युतीने दोन्ही जागा काबीज करून बाजी मारली आहे.

सोलापूर महानगरपालिकेच्या दोन जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस आघाडीला दोन्ही जागा गमवाव्या लागल्या. तर भाजप-सेना युतीने दोन्ही जागा काबीज करून बाजी मारली आहे. विशेषत: आगामी महापालिका निवडणुकीची नांदी समजल्या जाणाऱ्या या पोटनिवडणुकीत दोन्ही जागा जिंकल्यामुळे युतीमध्ये उत्साह संचारला आहे. काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांच्याशी फारकत घेत शिवसेनेत गेलेले माजी महापौर महेश कोठे हे पोटनिवडणुकीत एकतर्फी विजयी झाल्यामुळे पालिकेच्या राजकारणात त्यांचा पुनप्र्रवेश झाला आहे. तर कोठे यांना रोखण्याचा काँग्रेसचा प्रयत्न पूर्णत: फसला आहे.
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे स्थानिक राजकारण पाहणारे त्यांचे विश्वासू सहकारी विष्णुपंत कोठे यांचे महेश कोठे हे पुत्र आहेत. गेल्या पाच वर्षांपासून शिंदे-कोठे यांच्यात शीतयुद्ध चालले होते. अखेर गेल्या विधानसभा निवडणकीत या शीतयुद्धाला उघडपणे तोंड फुटले. महेश कोठे यांनी आपल्या वडिलांना काँग्रेसमध्ये सन्मानाची वागणूक मिळत नसल्याचे कारण पुढे करून पक्षाची साथ सोडली आणि शिवसेनेत प्रवेश करून विधानसभा निवडणुकीत शिंदे यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांनाच थेट आव्हान दिले. त्यामुळे पक्षांतर बंदीचा फटका बसून कोठे यांचे नगरसेवकपद रद्द झाले होते. तर काँग्रेसच्या नगरसेविका दमयंती भोसले यांचे आकस्मिक निधन झाल्याने दोन्ही रिक्त जागांवर पोटनिवडणूक झाली.
प्रभाग क्र. १८ ब मध्ये शिवसेनेचे महेश कोठे यांनी काँग्रेसचे कृष्णाहरी चिन्नी यांना एकतर्फी पराभूत केले. यात कोठे यांना ६०७५ मते मिळाली, तर प्रतिस्पर्धी चिन्नी यांना केवळ १२७५ मते पडली. कोठे हे ४८०० मतांची मोठी आघाडी घेत निवडून आले. माकपचे मेजर युसूफ शेख (१०५५), अपक्ष इरफान शेख (२३२) व मल्लिकार्जुन कोंका (७५) या अन्य उमेदवारांना नगण्य मते मिळाली. ९२ मते नकारात्मक (नोटा) होती. या प्रभागात ८८०४ इतके मतदान झाले होते. काँग्रेसचे चिन्नी यांच्यासह इतर सर्व उमेदवारांच्या अनामत रकमा जप्त झाल्या. कोठे हे प्रभाग क्र. १८ मधून (विडी घरकूल परिसर) १९९२ पासून सातत्याने निवडून येत आहेत.
प्रभाग क्र. ४ ब मध्ये दिवंगत नगरसेविका दमयंती भोसले यांच्या सून कांता राजेंद्र भोसले यांनी काँग्रेसला साथ न देता भाजपकडून उमेदवारी घेतली व यश मिळविले. कांता भोसले यांना एकूण झालेल्या ३७५५ मतदानापैकी २४५० इतके मतदान झाले. तर प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या पद्मावती गज्जम यांना केवळ ११५० एवढीच मते मिळू शकली. भोसले यांना १३०० मतांची आघाडी मिळाली. तिसऱ्या उमेदवार अनिता साळुंखे यांना अवघ्या ९२ मतांवर समाधान मानावे लागले. ‘नोटा’चा वापर ६३ मतदारांनी केला.
सकाळी महापालिकेच्या कौन्सिल हॉलमधील एका दालनात मतमोजणीला कडेकोट पोलीस बंदोबस्तात सुरुवात झाली. या वेळी पास वितरित करून देखील पत्रकारांना मतमोजणीस्थळी पोलिसांनी प्रवेश नाकारला होता. मिळालेले पास परत करीत पत्रकारांनी निवडणूक अधिकारी अमिता दगडे-पाटील यांच्या कार्यपद्धतीचा निषेध नोंदविला.
महापालिकेत यापूर्वी सुमारे २५ वर्षे महापालिकेच्या कारभारावर विष्णुपंत कोठे व त्यांचे पुत्र महेश कोठे यांचाच अंकुश होता. परंतु सुशीलकुमार शिंदे यांच्यापासून दुरावल्यानंतर कोठे पिता-पुत्राची महापालिकेतील एकाधिकारशाही संपुष्टात आली होती. महापालिकेच्या घसरलेल्या दर्जावर जेव्हा चर्चा उपस्थित व्हायची, तेव्हा विरोधकांकडून सुशीलकुमार शिंदे यांच्या बरोबर विष्णुपंत कोठे व महेश कोठे यांना खलनायक ठरविले जात असे. विशेषत: कोठे पिता-पुत्रावर विरोधक बरेच तोंडसुख घेत असत. परंतु बदलल्या राजकीय रंगमंचावर कोठे यांची भूमिका बदलली आणि विरोधकांना (भाजप-सेना युती) आता कोठे हे प्रिय वाटू लागले तर कालपर्यंत काँग्रेसचे स्थानिक राजकारण पाहणारे कोठे हे काँग्रेसजन पाण्यात पाहत आहेत. या पाश्र्वभूमीवर महापालिकेत महेश कोठे यांनी पुनर्प्रवेश केल्यामुळे आगामी पालिकेतील राजकारण तापणार असल्याचे सांगितले जाते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Former mayor mahesh kothe unilaterally win in by election of solapur