Deepak kesarkar on Rohit Arya Powai Hostage case : मुंबईतील पवई येथे १७ अल्पवयीन मुलांना ऑडिशनसाठी बोलवून एका स्टुडिओमध्ये एका कथित सामाजिक कार्यकर्त्याने ओलीस ठेवल्याचा प्रकार समोर आला होता. अखेर पोलिसांनी स्वच्छतागृहातून प्रवेश करून १७ मुलांसह एकूण १९ जणांची सुटका केली. यावेळी पोलिसांनी केलेल्या कारवाईत अपहरणकर्ता रोहित आर्य याचा मृत्यू झाला.
शालेय शिक्षण मंत्री असताना रोहित आर्यचा संपर्क आला होता, असे केसरकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले होते. दरम्यान रोहित आर्यने शासनाने कामाचे दोन कोटी रुपये थकवल्याचा आरोप केला होता. यासाठी त्याने दीपक केसरकर यांच्या घरासमोर आंदोलनही केले होते. मात्र आता रोहित आर्य याच्या या आरोपांबाबत माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
दीपक केसरकर नेमकं काय म्हणाले?
तुम्ही शालेय शिक्षणमंत्री असताना रोहित आर्य यांना एक कंत्राट मिळालं होतं आणि त्याचे पैसे बाकी होते म्हणून कालची घटना घडली असे म्हटले जात आहे असा प्रश्न केसरकरांना विचारण्यात आला. याबाबत एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना केसरकर म्हणाले की, “शासनाकडे कोणाचेही पैसे शिल्लक राहात नाहीत. त्यांच्या बाबतीत असं झालं होतं की, त्यांनी एक वेबसाइट तयार केली होती आण त्यावरून मुलांकडून पैसे स्वीकारले होते. त्यामुळे विभागाचं म्हणणं होतं की त्यांनी हे पैसे परत करावेत आणि असा प्रकार पुन्हा घडणार नाही असे त्यांच्याकडून लिहून घ्यावे. पण पुढे काय झालं हे मला माहिती नाही कारण मी पुढे शिक्षणमंत्री राहिलो नाही, पण त्यांनी जर त्याची पूर्तता केली असती तर त्यांचं बिल मिळण्यास कुठलीही अडचण असू नये असं मला वाटतं.”
“त्यांनी जो हा मार्ग अवलंबला ते पूर्णपणे चुकीचं आहे. मुलांना ओलीस धरणे चुकीचे आहे. मुलं ही अत्यंत कोवळ्या मनाची असतात त्यांच्यावर याचा परिणाम होऊ शकतो. असं जर झालं तर लोकांना हा एक मार्ग मिळून जाईल. त्यामुळे योग्य वेळी त्याच्यावर प्रतिबंध घातला पाहिजे. पोलिसांनी मुलांची सुखरूप सुटका केली ही खरोखर आनंददायी बाब आहे, पण त्यामध्ये रोहित आर्य यांचा दुर्दैवी मृत्यू झाला याबद्दल मला अतिशय दुखः होतंय. त्यांचे जर पैसे येणे असतील तर ते त्यांच्या कुटुंबीयांना कसे लवकरात लवकर मिळतील यासाठी मी प्रयत्न करेन,” असेही दीपक केसरकर पुढे बोलताना म्हणाले.
दोन कोटींच्या थकबाकीचं काय?
दोन कोटींच्या थकबाकीबद्दल विचारले असता केसरकर म्हणाले की, “दोन कोटी ही त्यांची थकबाकी नव्हती. आम्ही जी तरतूद करतो ती पूर्ण योजनेसाठी असते. एका व्यक्तीला देण्यासाठीची ही तरतूद नव्हती. त्या गैरसमजापोटी ते असं वागत असतील तर तो त्यांचा केवळ एक गैरसमज होता एवढंच मी सांगेन,” असेही केसरकर यांनी स्पष्ट केले.
घराबाहेर केलेल्या आंदोलनाबद्दल बोलताना केसरकर म्हणाले, “की त्यांनी आंदोलन केले असले तरी मी त्यावेळी अधिकाऱ्यांबरोबर त्यांच्या बैठका देखील घडवून आणल्या होत्या. त्यानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतलं होतं. त्यामुळे त्याचा आणि या गोष्टीचा संबंध जोडणं चुकीचं आहे. त्यांना जर मदत हवी होती तर त्यांनी थेट संपर्क साधला पाहिजे आणि तशी मदत मागितली पाहिजे. त्यांचे बिल यायला वेळ होता म्हणून मी त्यांना व्यक्तिगत सुद्धा थोडीफार मदत चेकने केली होती, असे केसरकर म्हणाले. शासनाच्या नियमांचे पालन करूनच प्रत्येकाला त्याची बिले मिळत असतात,” असेही केसरकर म्हणाले.
मुलांना ओलीस धरणं ही मुळात चुकीची बाब आहे. यामुळे चुकीची प्रथा पडेल. पोलिसांनी मुलांची सुखरूप सुटका केली ही आनंदाची बाब आहे, पण त्यामध्ये त्यांचा (रोहित आर्य) दुर्दैवी मृत्यू झाला यामध्ये खरोखर आम्हा सर्वांना दु:ख आहे. त्यांची काही बिलं देणे असेल तर आवश्यक ती मदत करण्यासाठी मी विभागाशी बोलेन, असेही केसरकर यावेळी म्हणाले आहेत.
