नांदेडचे माजी खासदार, माजी राज्यमंत्री गंगाधरराव मोहनराव कुंटुरकर (वय ८४) यांचे आज (शनिवार) सायंकाळी औरंगाबादेत निधन झाले. करोना संसर्ग झाल्याने त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू होते. कुंटुर या मूळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्यांच्या पश्चात पत्नी, पाच मुली, दोन मुलं, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. शुक्रवारी मतदान झालेल्या नांदेड जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे ते उमेदवार होते. १९९६ ते १९९८ या कालावधीत ते नांदेडचे खासदार होते. तर, १९८५ ते १९९० या काळात ते बिलोलीचे आमदार होते. याच काळात त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री पद भूषवले होते.

नांदेड जिल्ह्याच्या राजकारणातील महत्वाचे नेते अशी गंगाधरराव कुंटुरकर यांची ओळख होती. त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत अनेक पदं भूषवली. नांदेड जिल्ह्याच्या राजकारणावर कुंटुरकर यांचा अनेक वर्षे प्रभाव राहिलेला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीनंतर काही वर्षांपूर्वी त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. कुंटुरच्या सरपंचपदापासून त्यांच्या राजकारणाला सुरूवात झाली होती. त्यानंतर जिल्हापरिषद सदस्य, जिल्हा परिषद अध्यक्ष, आमदार, खासदार, जिल्हा बँकेचे संचालक व राज्य सहकारी बँकेचे संचालक माजी राज्यमंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास झाला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former minister of state gangadharrao kunturkar passes away msr
First published on: 03-04-2021 at 21:31 IST