परभणी : माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या काँग्रेस प्रवेशाचा मुहूर्त अखेर ठरला असून, उद्या (गुरुवारी) मुंबई येथे समर्थक कार्यकर्त्यांसह ते काँग्रेस पक्षात दाखल होत आहेत. बाबाजानी यांच्या निमित्ताने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक अनुभवी असे स्थानिक नेतृत्व जिल्ह्यात काँग्रेसला मिळेल, असा दावा केला जात आहे. विशेष म्हणजे सध्या महायुतीतल्या सत्ताधारी पक्षांमध्ये जिल्ह्यातल्या नेत्यांची पक्षांतरे होत असताना बाबाजानी मात्र त्याला अपवाद ठरले आहेत.

गेल्या लोकसभा निवडणुकीपासून बाबाजानी यांच्या पक्षप्रवेशासंबंधी विविध बातम्या येत होत्या. सुरुवातीला राष्ट्रवादी शरद पवार पक्षात असलेले बाबाजानी हे काही काळ अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतही दाखल झाले होते. दोन्ही पक्षांत घुसमट होत असलेल्या बाबाजानी यांनी अखेर काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी बाबाजानी यांची चर्चा झाली असून आता मुंबईत त्यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होत आहे.

बाबाजानी दुर्राणी हे जिल्ह्यातले एक अनुभवी नेते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी यापूर्वी दीर्घकाळ पार पाडली आहे. पाथरी या शहरावर त्यांचे एकहाती वर्चस्व राहिले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परभणी महानगरपालिकेसाठीही काँग्रेसला बाबाजानी यांचा पक्षप्रवेश साहाय्यभूत ठरण्याची चिन्हे आहेत. शहरात मुस्लिम मतदारांची संख्या निर्णायक आहे. सुरेश वरपूडकर यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने आता काँग्रेस पक्षात नेतृत्वाची फार मोठी पोकळी आहे. शहरातील मुस्लिम मतदारांवर प्रभाव टाकण्याच्या दृष्टिकोनातून बाबाजानी यांची भूमिका निर्णायक राहणार आहे. तीन वेळा विधिमंडळात प्रतिनिधित्व केलेल्या बाबाजानी यांचा काँग्रेस पक्षाला स्थानिक पातळीवर उपयोग होणार असून त्यांच्या निमित्ताने मराठवाड्यातील एक ज्येष्ठ नेता काँग्रेसला लाभला आहे.

आयुष्यभर आपण धर्मनिरपेक्ष राजकारण केले आहे. सद्य:स्थितीत देशपातळीवर भारतीय जनता पक्षाला केवळ काँग्रेसच ठामपणे विरोध करू शकते. महाराष्ट्रातील जातीय आणि धर्मांध राजकारणाला विरोध करण्याची गरज असून, त्यासाठी काँग्रेस हाच सक्षम पर्याय आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांना दिली आहे.

दरम्यान, स्थानिक पातळीवर बाबाजानी यांनी काँग्रेसमधील कार्यकर्त्यांशी चर्चा केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या पक्षप्रवेशासंबंधी सुरू असलेल्या वेगवेगळ्या मतप्रवाहांना या निमित्ताने पूर्णविराम मिळाला आहे. पाथरी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे राजकारण उभे करतानाच जिल्ह्यात पक्षाचा जनाधार वाढण्यासाठी बाबाजानी यांना लक्ष द्यावे लागणार आहे. तूर्त आपण पक्षाकडे कोणत्याही पदाची मागणी केली नसून, जी जबाबदारी सोपवली जाईल ती पार पाडण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण करू, असे बाबाजानी म्हणाले.