माजी आमदार पोकर्णा यांची संरक्षणाची मागणी
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची पत्नी, आमदार अमिता चव्हाण व आमदार अमर राजूरकर यांच्यापासून जीवितास धोका असल्याची तक्रार नव्याने भाजपमध्ये दाखल झालेल्या माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. या प्रकारचे निवेदन प्राप्त झाले असल्याचे पोलीस आयुक्त परमजीतसिंह दहिया यांनी सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून नांदेड जिल्ह्य़ातील भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीवरून राजकारण तापले होते. या कारखान्याच्या निवडणुकीत विरोधी पॅनेलकडून विविध ठिकाणी सहा सभा घेतल्या. त्यात प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्या विरोधात टीका केली होती. त्याचा राग मनात धरून आपणास धमक्या दिल्या जात आहेत. गेल्या ६ महिन्यांपासून भाजपचे काम करीत असताना आपणावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात होता. दूरध्वनीवरून मला व माझ्या कुटुंबीयांना धमकावले जात होते. निवडणूक निकालाचे निमित्त करून माझ्या घरावर हल्ला करण्याचाही प्रयत्न केला गेला.
मिरवणुकीच्या रूपाने २०० जणांचा जमाव माझ्या घरी पाठवून धमकावण्यात आले. एकेरी भाषेत शिवीगाळ करण्यात आली. विलास धबाले, संघरत्न कांबळे यांनी नगरसेवक विनय येवणकर यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या या मिरवणुकीतील २०० जणांचा जमाव माझ्या घरावर पाठवला होता. यास खासदार चव्हाण, अमिता चव्हाण व अमर राजूरकर यांची चिथावणी होती. माझ्या कार्यालयाजवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात त्याचे चित्रीकरण झाले आहे.