रत्नागिरी जिल्ह्यातील राजापुर लांजा विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार राजन साळवी यांनी अखेर शिवसेना ठाकरे गटाला धक्का देत उपनेते पदाचा राजीनामा दिला आहे. गुरुवारी दुपारी साळवी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे.

विधानसभा निवडणुकीतील पराभवा नंतर नाराज राजन साळवी हे भाजपात जाण्याची जोरदार चर्चा होती. मात्र त्यांनी शिंदे गटाची कास धरण्याचा निर्णय घेतला आहे. गेले काही दिवस शिवसेना ठाकरे पक्षाला सोडचिठ्ठी देण्याची चर्चा असलेले माजी आमदार साळवींनी ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेतेपदाचा राजीनामा देत शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. ते उद्या गुरुवारी दुपारी तीन वाजता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. कोकणात ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. त्यामुळे कोकणात ‘ऑपरेशन टायगर’ला सुरुवात झाल्याची चर्चा पुन्हा जोर धरु लागली आहे.

कोकणातील शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा काही काळासाठी चांगलीच रंगली होती. भाजपमधील प्रवेशाच्या चर्चेबाबत मात्र साळवींनी थेट बोलणे टाळले होते. ‘मी बाळासाहेबांचा लाडका शिवसैनिक आहे. त्यांना अभिप्रेत असलेले काम मी आजपर्यंत केले आणि त्यांच्याच विचारांचे काम मी पुढे नेणार आहे,’ असे सांगितले होते. मात्र मालमत्ते बाबत पोलिसांकडून वारंवार होणारी चौकशी आणि पक्ष संघटनेतील अंतर्गत वादाला कंटाळून ठाकरे गटाला सोडत असल्याचे सांगण्यात येत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माजी आमदार राजन साळवी यांनी नगरसेवक, नगराध्यक्ष, जिल्हाप्रमुख, तीन वेळा आमदार, आता उपनेता अशा विविध पदांवर काम केले आहे. त्यामुळे साळवी यांच्यासारख्या मोठ्या नेत्याचा शिवसेनेमध्ये प्रवेश झाल्यास कोकणात महायुतीची ताकद वाढणार आहे. माजी आमदार राजन साळवी यांना विधान परिषदेवर संधी मिळण्याची शक्यता असून त्यांना तसा शब्द देण्यात आल्याची चर्चा आहे.