अहिल्यानगर : खासदार असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विकास कामांसाठी भरपूर मदत केली, त्यासाठी मला येथील प्रस्थापितांशी मोठा संघर्ष करावा लागला आणि या संघर्षानेच आमची ‘विकेट’ घेतली असे सांगत माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर प्रथमच आपली खदखद श्रीरामपूर येथील कार्यकर्ता मेळाव्यात व्यक्त केली. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संगमनेर येथील आभार दौऱ्यासाठी सर्वांनी गट-तट विसरून उपस्थित रहाण्याचे आवाहन केले.

श्रीरामपूर तालुक्यातील उंबरगाव येथे माजी खासदार लोखंडे यांच्या संपर्क कार्यालयात उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या आभार दौऱ्याच्या नियोजनासंदर्भात शिवसेनेच्या (शिंदे गट) पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी सदाशिव लोखंडे बोलत होते. यावेळी पंचगंगा साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे, संपर्कप्रमुख बाळासाहेब पवार, माजी जिल्हाप्रमुख राजेंद्र देवकर, जिल्हा संघटक विजय काळे, किसान महासंघ कृषी प्रोडूसर कंपनीचे संचालक प्रशांत लोखंडे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख सुनीता शेळके, माजी उपनगराध्यक्ष संजय छल्लारे, युवा नेते प्रशांत लोखंडे, अशोक कारखान्याचे संचालक निरज मुरकूटे यांच्यासह पदाधिकारी शुभम वाघ, शुभम उगले, श्रीकांत भागवत, सारिका वाव्हाळ, सुनिल कराळे, विशाल शिरसाठ, संजय वाकचौरे, राजेंद्र लोंढे, किशोर वाघमारे आदी उपस्थित होते.

माजी खासदार लोखंडे म्हणाले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर सर्वसामान्यांसह लाडक्या बहिणी, शेतकरी प्रेम करतात, मी खासदार असताना मला येथील साखर सम्राटांशी संघर्ष करावा लागला. ते वरती ‘तडजोड’ करतात, मात्र आम्हाला अधिकारासाठी संघर्ष करावा लागतो. या संघर्षामुळेच लोकसभेला आमची विकेट घेतली. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना बळ दिले पाहिजे, सरकारच्या योजनांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना मदत केली पाहिजे, मी निळवंडे धरणाच्या पाण्यासाठी मोठा संघर्ष केला.

एका रात्रीत शिंदे मुख्यमंत्री असताना पालकमंत्र्यांना न विचारता १८२ गावांना पाणी सोडायला लावले. शिर्डीतील पूरग्रस्तांना १ कोटी १० लाख रुपये मिळून दिले. यासाठी मोठा संघर्ष करावा लागला आणि त्याचा परिणाम आम्हाला लोकसभेच्या निवडणुकीत भोगावा लागला. आता वाईट-चांगल्यांच्या वादात पडण्यापेक्षा आपण काम करत राहू, समाजाच्या सुखदुःखात उभे राहू. पक्ष काय करेल ते करेल, पण आपण काम करत राहू. गट-तट सोडून सर्वांनी संगमनेरच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.

लोखंडे यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत शिर्डी मतदारसंघातून, शिंदे गटाकडून उमेदवारी केली होती. त्यापूर्वी ते याच मतदारसंघातून विजयी झाले होते.