माजी खासदार, ज्येष्ठ सर्वोदयी नेते सदाशिवराव ठाकरे यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९७ वर्षांचे होते. प्रकृती अस्वस्थामुळे त्यांना आज (मंगळवार) सकाळी यवतमाळ येथील क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथेच संध्याकाळी ७ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. उद्या (बुधवार) इंजाळा, ता. घाटंजी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

यवतमाळ जिल्हा परिषदेचे अध्यक्ष,आमदार आणि खासदार असा त्यांचा राजकीय प्रवास होता. यवतमाळ जिल्ह्यात त्यांनी सपत्नीक भूदान पदयात्रा करून, विदर्भात सर्वाधिक जमिनीचे दान मिळविले होते. त्यासाठी आयोजित कार्यक्रमात तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते त्यांना सन्मानीतही करण्यात आले होते.

सदाशिवराव ठाकरे हे महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या प्रेरणेतून सर्वोदयवादी जीवन जगत होते. अनेक वर्ष ते यवतमाळ
जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष होते. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक यांचे ते समकालीन
राजकीय मित्र होते.  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी त्यांचा कौटुंबिक स्नेह सर्वश्रुत आहे. त्यांच्या पश्चात मुलगा माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र ठाकरे यांच्यासह मोठा परिवार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.