दरोडा घालण्याच्या तयारीत असलेले चार जण अटकेत
पेट्रोल पंपावर दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या चार दरोडेखोरांना शनिवारी रात्री कासारवडवली पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून बनावट बंदूक, चाकू, मिरची पूड साहित्य जप्त केले आहे.
शोएब खान (२६), कुशाल पुजारी (१९), बालाजी कोळगिरे (१९), साहिल शेख (१९) अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे आहेत. हे चारही जण काशिमीरा येथील रहिवासी आहेत.
घोडबंदर येथील गायमुख आणि ओवळा परिसरात असलेल्या सीएनजी पंपावर काही जण दरोडा घालण्याच्या तयारीत असल्याची माहिती कासारवडवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांना मिळाली होती. त्याआधारे, पोलिसांनी या दोन्ही पंपांवर सापळा रचला होता. दरम्यान, शोएब, कुशाल, बालाजी आणि साहिल हे चौघे ओवळा येथील पंपावर आले असता पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता ओवळा आणि गायमुख परिसरातील सीएनजी पंपावर दरोडा घालण्याच्या तयारीत असल्याची कबुली त्यांनी दिली. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
लैंगिक अत्याचारप्रकरणी दहा वर्षांचा कारावास
तीन वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी शालेय बसमधील ५१ वर्षांच्या मदतनीसाला विशेष न्यायालयाने १० वर्षांची शिक्षा सुनावली आहे. २०१४ मध्ये हे प्रकरण उघडकीस आले होते.
पीडित मुलगी आणि तिच्या आईने दिलेली साक्ष न्यायालयाने त्याला शिक्षा सुनावताना प्रामुख्याने ग्राह्य़ धरली. या मुलीने न्यायालयासमोर साक्ष दिली त्या वेळी ती सहा वर्षांची होती. त्यामध्ये बसमध्ये तिच्यासोबत केवळ ‘ब्लू अंकल’ म्हणजेच निळ्या गणवेशातील आरोपी होता. बसमधील महिला मदतनीस तेव्हा तेथे उपस्थित नव्हती. दुसरा ‘ब्लू अंकल’ हा अन्य मुलांना बसमधून उतरवत होता. तर ‘ब्राऊन अंकल’ म्हणजेच बसचा चालक बसची पाहणी करत होता. यापूर्वीही आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता, असेही या मुलीने न्यायालयात बसलेल्या आरोपीची ओळख पटवताना सांगितले होते. दरम्यान, बसमधील महिला मदतनीसाने आरोपीच्या वतीने साक्ष देताना पुरुषांना बसमध्ये जाण्यास मज्जाव असल्याचे सांगितले होते.