मोबाइल टॉवर लाइनचे काम करून कारमधून परतताना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत कारमधील चौघे युवक जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना कुरूल-कामती (ता. मोहोळ, जि. सोलापूर) येथे सोमवारी मध्यरात्री १.३० च्या सुमारास घडली. अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी, उमाकांत मधुकर शिवशेट्टी, रामा श्रीपती कदम, लक्ष्मण गणपती फाळके (सर्व रा. वाघोली, ता. मोहोळ), विनोद दत्तात्रय गायकवाड (रा. कामती बु, ता. मोहोळ) व मनोज पांडुरंग बनसोडे (रा. पेनूर, ता. मोहोळ) हे मोहोळ येथे मोबाइल टॉवरचे काम करण्यासाठी गेले होते. रात्री उशिरा काम संपवून ते पुन्हा कामतीकडे कारमधून (एमएच १४ सीएस ५१४४) माघारी परतत असताना कुरूल येथील गॅस गोडावूनसमोर अज्ञात भरधाव वाहनाने त्यांना धडक दिली. यात उमाकांत शिवशेट्टी, रामा कदम, मनोज बनसोडे व विनोद गायकवाड हे जागीच ठार झाले. तर लक्ष्मण फाळके हे गंभीर जखमी झाले. जखमीवर सोलापूर येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर अज्ञात वाहनचालकाने पळ काढला. त्याच्याविरोधात कामती पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Four dead in car accident near solapur
First published on: 27-09-2016 at 14:13 IST