जालना: जिल्हयातील राजूर ते टेंभूर्णी रस्त्यावर गाढेगव्हाण (तालुका-जाफराबाद) गावाच्या शिवारात कार विहिरीत पडून चार जणांचा मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

या अपघातामध्ये ज्ञानेश्वर भाऊराव डकले, निर्मला सोपान डकले (राहणार गेवराई गुंगी, जिल्हा – छत्रपती संभाजीनगर) पद्‌माकर लक्ष्मण भांगिरे, ज्ञानेश्वर लक्ष्मण भांगिरे (कोपर्डा, जिल्हा छत्रपती संभाजीनगर) अशी या अपघातातील मृतांची नावे आहेत. ही कार छत्रपती संभाजीनगर येथून बुलडाणा जिल्हयातील सुलतानपूर येथे चालली होती. सकाळी फिरण्यासाठी निघालेले भगवान साळूना बनकर (राहणार-गाढेगव्हाण, तालुका – जाफराबाद) यांना धडक देऊन ही कार रस्त्याच्या बाजूस असलेल्या ७० फूट खोल विहिरीतील पाण्यात पडली.  कारच्या धडकेमुळे भगवान बनकर हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जालना येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.