लोणावळा : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर साते गावाजवळ शनिवारी सकाळी आळंदीला निघालेल्या पायी दिेडीत टेम्पो शिरून चार महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

अपघातात २४ वारकरी जखमी झाले असून दिंडीत सहभागी झालेले वारकरी रायगड जिल्ह्यातील कर्जत, खालापूर, उंबरे परिसरातील आहेत. जखमी वारकऱ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

सविता  वाळकू येरम (वय ५५), जयश्री आत्माराम पवार ( ५४ ), विमल सुरेश चोरघे ( ५०), संगीता वसंत शिंदे (५६ ) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत.

खोपोली भागातील वारकरी उंबरे येथील माऊली कृपा ट्रस्टचे लक्ष्मणमहाराज येरम यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडीत सहभागी होतात.

आळंदीला दरवर्षी कार्तिक महिन्यात वारीचे आयोजन करण्यात येते. शनिवारी (२७ नोव्हेंबर) सकाळी सातच्या सुमारास मावळ तालु्क्यातील साते गावाजवळ भरधाव टेम्पो दिंडीत शिरला.

अपघाताची माहिती मिळताच त्वरित पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी वारकऱ्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांदरम्यान  येरम, पवार, चोरघे, शिंदे यांचा मृत्यू झाला.

याप्रकरणी  वडगाव मावळ पोलीस ठाण्यात टेम्पोचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.