MLA Gopichand Padalkar vs Jitendra Awhad: विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. अधिवेशनात सत्ताधारी आमदार आणि विरोधक सभागृहात जनतेच्या प्रश्नांसाठी एकमेकांवर आगपाखड करत असतात, आपला मुद्दा आक्रमकपणे मांडत असतात, असे साधारण चित्र आजवर दिसत असे. मात्र आता विधिमंडळात आमदार, मंत्री यांच्या कार्यकर्त्यांची संख्या वाढू लागली आहे. हे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा धक्कादायक प्रकार आज विधिमंडळात घडला. भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादीचे (शरद पवार) आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यात गेल्या दोन दिवसांपासून शाब्दिक खटके उडत होते. त्याची परिणिती आज त्यांच्या कार्यकर्त्यांच्या हाणामारीत झालेली पाहायला मिळाली.

“विधानसभेत गुंडाना प्रवेश देणार असाल तर आमचे लोक सुरक्षित नाहीत. मी एक्सवर याबाबत पोस्ट केली आहे. त्यावर मला अश्लाघ्य टीका करण्यात आली. मी सभागृहात भाषण केल्यानंतर मोकळी हवा खाण्यासाठी बाहेर आलो असता माझ्यावर थेट हल्ला करण्यात आला. ते गुंड मलाच मारण्यासाठी आले होते”, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला.

शिवसेनाप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या विषयावर नाराजी व्यक्त केली. गुंडगिरी आता विधिमंडळात पोहोचली असल्याचा आरोप त्यांनी केला. “या गुंडांना कुणी प्रवेशिका दिल्या? त्यांची नावे उघड केली पाहिजे. तसेच विधानसभेच्या अध्यक्षांनी हाणामारी करणाऱ्या गुंडांवर आणि त्यांच्या पोशिद्यांवर कारवाई करावी. विधिमंडळ हे लोकशाहीचे मंदिर आहे. इथे जर अशाप्रकारे मारहाण होत असेल तर विधानभवनाचे महत्त्व उरले आहे का? असा प्रश्न निर्माण होतो”, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी याबाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित केला. जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना कुणी मारहाण केली, याचा शोध घ्यावा, अशी मागणी त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे केली.

तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या महिला आमदार सना नवाब मलिक यांनीही हा मुद्दा सभागृहात मांडला. माझ्यासमोरच सदर मारहाण झाली. विधिमंडळात पुरूषांचा लोंढा इतका वाढला आहे की, महिला आमदारांना चालणेही अवघड झाले आहे, असे त्या म्हणाल्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले…

विधिमंडळात घडलेली घटना दुर्दैवी आहे. अशी घटना घडायला नको होती. विधिमंडळ परिसर विधानसभेचे अध्यक्ष, विधानपरिषदेचे सभापती यांच्या अखत्यारित येतो. त्यामुळे त्यांनी यावर कडक भूमिका घेऊन कारवाई करावी, अशी मागणी मी केलेली आहे. विधिमंडळात इतक्या मोठ्या प्रमाणात लोक जमतात आणि मारामारी करतात, हे योग्य नाही. त्यामुळे या प्रकरावर निश्चितच कारवाई होणार, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

वादाची सुरुवात कशी झाली?

मागच्या आठवड्यात जितेंद्र आव्हाड यांनी विधिमंडळात प्रवेश करत असताना “मंगळसूत्र चोराचा.., मंगळसूत्र चोराचा…” अशी घोषणाबाजी केली होती. यावेळी त्यांनी कुणाचेही नाव घेतले नव्हते. मात्र त्यांनी भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांना लक्ष्य केल्याचे सांगितले जाते. यानंतर १६ जुलै रोजी आमदार गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या विधिमंडळाच्या गेटवर बाचाबाची झाली. गोपीचंद पडळकर यांनी आपल्या गाडीचा दरवाजा जोरात उघडल्यामुळे तो आमदार जितेंद्र आव्हाड आणि संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांना लागल्याचा आरोप आव्हाड यांच्याकडून करण्यात आला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या सर्व घडामोडीनंतर आज गुरुवारी १७ जुलै रोजी दोन्ही आमदारांचे कार्यकर्ते भिडले आणि त्यांनी विधिमंडळाच्या लॉबीतच हाणामारी केली.