गडचिरोलीतील दादापूर येथे तब्बल ३६ वाहनांची जाळपोळ केल्यानंतर नक्षलवाद्यांनी बुधवारी कुरखेड्यापासून अवघ्या ६ किलोमीटर अंतरावरील जांभूरखेडा गावाजवळ भूसुरुंग स्फोट घडवला. या स्फोटात १५ जवान शहीद झाले असून या घटनेने महाराष्ट्र दिनी पोलीस दलावर शोककळा पसरली आहे.
मंगळवारी मध्यरात्री कुरखेडा तालुक्यातील दादापूर(रामगड) येथे नक्षल्यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या कामावरील तब्बल ३६ वाहने, यंत्रसामग्री व कार्यालये जाळली. त्यानंतर बुधवारी सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास जलद प्रतिसाद पथकातील जवान खासगी वाहनाने कुरखेडा येथून पुढे जात असताना कुरखेड्यापासून ६ किलोमीटर अंतरावरील जांभूरखेडा गावाजवळील पुलावर नक्षलींनी भूसुरुंग स्फोट घडवला. यात १५ जवान शहीद झाले असून खासगी वाहनाचा चालकही ठार झाला आहे. घटनास्थळी नक्षली आणि पोलिसांची चकमक सुरु असल्याचे समजते.
मध्यरात्री जाळली होती ३६ वाहने
पुराडा-मालेवाडा-येरकड या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १३६ चे काम सुरु असून, हे काम दुर्ग येथील अमर इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीद्वारे करण्यात येत आहे. या कंपनीचा दादापूर येथे गावाशेजारीच डांबर प्लांट असून, दोन कार्यालयेही आहेत. तेथे अनेक वाहने होती. मंगळवारी रात्री दीडशेहून अधिक सशस्त्र नक्षली दादापूर येथे गेले. त्यांनी संपूर्ण गावभर शासनाविरोधात मजकूर लिहिलेले बॅनर लावले आणि नंतर वाहने व अन्य यंत्रसामग्रीला आग लावली होती.