गडचिरोली जिल्हय़ातील भामरागड तालुक्यात गुरुवारी सकाळी पोलीस व नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत सात नक्षलवादी ठार झाले.  भामरागडपासून ४० किलोमीटरवर असलेल्या भटपर व कवंढे गावांच्या दरम्यान असलेल्या जंगलात ही चकमक उडाली. अलीकडच्या तीन महिन्यातील गडचिरोली पोलिसांची ही दुसरी मोठी यशस्वी कामगिरी असून गुरुवारच्या कारवाईत पोलिसांनी मोठा शस्त्रसाठाही जप्त केला आहे.
या जंगलामध्ये नक्षलवाद्यांनी एका बैठकीचे आयोजन केल्याची माहिती मिळाल्यानंतर भामरागडचे उपविभागीय अधिकारी भरत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सायंकाळी सी-६० च्या तीन पथकांनी या भागात शोध मोहीम हाती घेतली होती. गुरुवारी सकाळी सहाच्या सुमारास अडीचशे नक्षलवादी या दोन गावांना लागून असलेल्या इंद्रावती नदीच्या तीरावर बैठक घेत असल्याचे दिसून आल्यानंतर पोलिसांनी नक्षलवाद्यांना तीनही बाजूने घेरले. ही बाब नक्षलवाद्यांच्या लक्षात येताच त्यांनी पोलिसांवर गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरात सी-६० च्या जवानांनीसुध्दा गोळीबार केला. यात सात नक्षलवादी जागीच ठार झाले. उर्वरित नक्षलवादी छत्तीसगडमध्ये पळून जाण्यात यशस्वी ठरले. ठार झालेल्या पाच नक्षलवाद्यांमध्ये दोन महिला आहेत. त्या सर्वाची ओळख पटवण्याचे काम सध्या सुरू असून रात्री उशिरापर्यंत ते पूर्ण होईल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. याआधी गेल्या २० जानेवारीला अहेरी तालुक्यात पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत सहा नक्षलवादी ठार झाले होते.
छत्तीसगडच्या सीमेला लागून असलेल्या या भागात पोलिसांचे एकही ठाणे नाही. त्याचा फायदा घेत या भागात सक्रिय असलेल्या कंपनी क्रमांक दहाच्या नक्षलवाद्यांनी ही बैठक आयोजित केली होती. या बैठकीला छत्तीसगडमध्ये सक्रिय असलेल्या इंद्रावती नॅशनल पार्क कंपनीचे नक्षलवादीसुध्दा हजर होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.