गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षात २० भारतीय जवानांना वीरमरण आलं. त्यामुळे चीन-भारत संबंध ताणले गेले आहेत. या विषयावरून राजकारण प्रचंड तापलं असून, दररोज नवंनवे प्रश्न सरकारला विचारले जात आहेत. गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षावरून शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. परराष्ट्र व संरक्षणविषयक चुकलेल्या धोरणाचे हे फलित असून, चीनच्या आक्रमणाने बाहुबली राजकारणाची हवा निघाली,” असा घणाघात संजय राऊत यांनी केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवसेना नेते संजय राऊत यांनी सामनात लिहिलेल्या लेखातून गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षावर भाष्य केलं आहे. मोदी सरकारच्या धोरणांचं विश्लेषण करण्याबरोबरच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत वाढलेल्या जवळकीवर टीका केली आहे. “चीनने आपले २० सैनिक मारले. त्याचा बदला मोदी सरकार कसा घेणार, हाच खरा सवाल आहे. की बदला घेण्यासाठी, सर्जिकल स्ट्राइक करून विजयी डंका पिटण्यासाठी पाकिस्तान हा राखीव ठेवला आहे? २० जवानांच्या हत्येचा बदला मोदी सरकारने घेतला नाही तर ती आपली सगळ्यात मोठी मानहानी ठरेल. १९६२चे चीनबरोबरचे युद्ध नेहरूंच्या धोरणांमुळे हरलो हा डंका भाजपला आता पिटता येणार नाही. गलवान व्हॅलीत चीनचे सैन्य घुसले व आज गलवान व्हॅली चिनी सैनिकांच्या कब्जात आहे. चिनी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने बुधवारी दुपारी अधिकृतपणे जाहीर केले की, ‘गलवान व्हॅली हा चीनचाच भूभाग आहे.’ यावर हिंदुस्थानकडून कोणतीही प्रतिक्रिया उमटली नाही. मोदी सरकारने तटस्थतेचे धोरण सोडून अमेरिकेच्या जास्त कच्छपी लागण्याचे धोरण स्वीकारले व सीमेवरचा चीन जास्त आक्रमक झाला हे येथे लक्षात घेतले पाहिजे. हिंदुस्थानच्या सीमेवरील बहुतेक सर्व राष्ट्रे आज चीनची मांडलिक आहेत. पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका ही राष्ट्रे चीनच्या मदतीवर जिवंत आहेत व चीनच्या इशाऱयावर हिंदुस्थानला आव्हान देत आहेत. महासत्ता अमेरिकेशी मैत्री वगैरे ठीक, पण सीमा अशांत राहिल्या तर महासत्ता काय करणार? अमेरिकेसाठी निकटचा शेजारी असलेल्या चीनशी भांडण करणे ही परराष्ट्र व संरक्षणविषयक नीती असू शकत नाही. दुर्दैवाने आज तेच घडताना दिसत आहे”, असं राऊत यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Galwan valley shivsena leader sanjay raut criticised pm narendra modi bmh
First published on: 21-06-2020 at 09:56 IST