प्रशांत देशमुख

गांधी विचाराचे पाईक घडवणाऱ्या ‘गांधी विचार परिषद’ या संस्थेलाही ‘करोना’ने ग्रासले आहे. २०२०-२१  या सत्रात विद्यार्थी  इकडे फिरकलेच नसल्याने संस्थेवर गाशा गुंडाळण्याची वेळ आली आहे.

बजाज समूहातर्फे  १९८७ ला ‘इन्स्टिट्यूट ऑफ  गांधीयन स्टडीज’ म्हणून ही संस्था स्थापन करण्यात आली. ‘गांधी विचार परिषद’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या संस्थेत वर्षभराचा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम शिकवला जात असे. १५ विद्यार्थ्यांच्या प्रवेश व्हायचा. निवासी स्वरूपाचे शिक्षण होते. या सर्व विद्यार्थ्यांवर संस्थेतर्फे  ४५ लाख  तर एकूण कामकाजावर ६० लाखांचा वार्षिक खर्च होत होता. संस्थेतर्फे  शिक्षित विद्यार्थ्यांनी देशविदेशात गांधी मूल्यांवर आधारित उपक्रम राबवले.  मात्र करोनाचा दंश अभ्यासक्रमास संपुष्टात आणणारा ठरला.

२०२०-२१ या सत्रात विद्यार्थी फिरकलेच नाही. करोना संक्रमणाची स्थिती कायम असल्याने या सत्रातसुद्धा विद्यार्थी मिळणे कठीण आहे. त्यामुळे अभ्यासक्रम व अनुषंगिक खर्चाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. परिषदेचे संचालक भरत महोदय म्हणाले, मोठमोठ्या विद्यापीठांनाच करोनाने ग्रासले आहे. विद्यार्थी यायला तयार नाहीत. शिकवायचे कुणाला? त्यामुळे अभ्यासक्रम नाईलाजास्तव बंद करावा लागत आहे. संस्थेत कार्यरत अकरा कर्मचाऱ्यांचाही प्रश्न आहे. वर्षभरापूर्वी त्याबाबत चांगलीच ओरड झाली. मात्र स्थिती निदर्शनास आल्यावर काहीसे निवळले. नऊ कर्मचाऱ्यांना शिक्षा मंडळ या सहयोगी संस्थेत सामावून घेण्यात आले. रोजंदारीवर काम करणाऱ्या मनुष्यबळाची समस्या आहेच. पूर्णवेळ नसलेल्या कर्मचाऱ्यांनी स्थायी असल्याप्रमाणे मागण्या मांडल्या. त्या पूर्ण करणे शक्य नाही. तरीही आम्ही रोजंदारीवर ठेवण्याचा पर्याय खुला ठेवला आहे. शासकीय निरीक्षण असल्याने मुद्दा जटील झाल्याचे संस्थेचे विश्वस्त संजय भार्गव यांनी सांगितले. संस्थेचा परिसर गीता प्रतिष्ठानच्या मालकीचा आहे. प्रतिष्ठानने जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेला तो भाडेतत्त्वावर दिला होता. संस्थेचे कार्य सुरूच राहील, असे नमूद करीत भार्गव म्हणाले की गांधी विचारांप्रती बजाज समूहाची कटिबद्धता कायम आहे.