दहा दिवस मनोभावाने सेवा केल्यानंतर राज्यभरात गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला गुरुवारी आनंद आणि भारावलेल्या मनाने निरोप दिला. राज्यभरात गणरायाचे शांततेत विसर्जन सुरू असताना अनेक ठिकाणी गालबोट लागलं असून, अनेक भक्तांवर मृत्यू ओढवला. मुंबई, कोकणासह राज्यभरात १९ भाविकांना जलसमाधी मिळाली असून, शोककळा पसरली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमरावती – पूर्णा नदीत बुडून चार जणांचा मृत्यू
अमरावतीत विसर्जनासाठी पाण्यात उतरलेल्या एका तरुणाला बुडताना वाचवायला गेलेल्या इतर तीन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. या घटनेमुळे अमरावतीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सतीश जाबराव सोळंके, ऋषीकेश बाबुराव वानखेडे, सतीश बारीकराव वानखेडे आणि सागर अरुण शेंदूरकर अशी नदीत बुडालेल्या चौघांची नावं आहेत.

रत्नागिरी – राजापूरात तीन तरूण बुडाले
गणपती विसर्जनासाठी गेलेले तीन तरूण बुडाल्याची दुर्देवी घटना राजापूरात दोन ठिकाणी घडली आहे. गुरूवारी सायंकाळी पावणे सात वाजता धोपेश्वर येथे सिध्देश प्रकाश तेरवणकर (वय २०) हा तरुण बुडाला. तर पडवे येथे गणपती विसर्जनासाठी गेलेले दोन तरूण बुडाले. कुलदीप रमाकांत वारंग (वय २०) आणि ऋतिक दिलीप भोसले (वय २६) असे बुडालेल्यांची नावे आहेत.

तारकर्ली – आचरा समुद्रात दोन तरूण बुडाले
येथील आचरा समुद्रामध्ये गणपती विसर्जनाच्या वेळी दोन तरूणांचा बुडून मृत्यू झाला आहे. गुरुवारी सायंकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. घरगुती गणपतींचे विसर्जन करण्यासाठी आचरा येथे समुद्रात गेलेले प्रशांत तावडे आणि संजय परब गणपती विसर्जन करून माघारी परतत असताना लाटेच्या तडाख्यात पाण्याचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडाले.

नगरमध्ये दोघांचा बुडून मृत्यू
नगरमध्ये विसर्जनासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे. श्रीरामपूर येथील प्रवरा नदीत आणि शेवगावमधील ढोरा नदीत बुडून प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.

नागपुरात दोघांचा मृत्यू
गणेश विसर्जन करण्यासाठी गेलेल्या काका-पुतण्याचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना नागपूरात घडली आहे. ही घटना शहाराजवळ असलेल्या हिंगणा परिसरातील संगम व खरी पन्नासे गावादरम्यान असलेल्या वेणा नदीत घडली. सुरेश शिवराम फिरके (वय ४८) आणि त्यांचा पुतण्या अजिंक्य रमेश फिरके (वय १८) अशी मृतांची नावे आहेत.

वाशिम – घरगुती गणेश विसर्जनादरम्यान एकाचा मृत्यू
घरगुती गणेश विसर्जनादरम्यान वाशिममधील मंगरूलपीर तालुक्यात मसोला खुर्द येथे १७ वर्षीय मुलाचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे.

नांदेडमध्येही एकाचा मृत्यू
हदगाव तालुक्यातील तामसा गावातलील एका तरूणाचा गणेश विसर्जनाच्या वेळी मृत्यू झाला. शशिकांत कोडगीरवार (वय २१) असं त्या युवकाचं नाव आहे.

ठाणे – शहापूरात मुलाचा बुडून मृत्यू
कुंडनच्या नदी तोल जावून एका १२ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कल्पेश प्रकाश जाधव ( वय १२ ) असं मुलाचं नाव असून तो कुंडन गावातील कातकरी वाडी राहाणारा आहे.

कराडमध्ये एकाचा मृत्यू
आगाशिव नगर येथील चेतन शिंदे हा गणेश भक्त कोयना नदीमध्ये वाहून गेला आहे. गणरायाच्या विसर्जनावेळी ही घटना घडली. पाण्याच्या प्रवाहामुळे मुलगा सापडला नाही.

भंडाऱ्यात एकाचा मृत्यू
लाखांदूर तालुक्यातील ढोलसर गावात राहणारा लोकेश देवराम शिवणकर गणपती विसर्जना दरम्यान मासळ शेतशिवारातील नाल्यात वाहून गेले आहेत. त्यांचे वय ४० वर्षे आहे. उपस्थित नागरिकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु पाण्याचा प्रवाह जोरदार असल्याने त्याला यश आलं नाही.

वर्धा – विसर्जनाला गेलेल्या युवकाचा मृत्यू
गणपती विसर्जनाला गेलेल्या युवकाचा मृत्यू झालाय. जुनापाणी येथे शेतातील विहिरीत विसर्जन करीत असताना तरुण बुडाला. गुणवंत गाखरे असं मृतकाचं नाव.

मराठीतील सर्व गणेशोत्सव २०१९ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganesh immersion 19 devotee drawn into the river and sea in state nck
First published on: 12-09-2019 at 23:43 IST