सांगली : श्रावण महिना आणि अंगारकी संकष्टी यामुळे मंगळवारी सांगलीसह तासगावमध्ये गणेशदर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. पहाटेपासूनच भाविक दर्शनासाठी रांगेत उभे होते. भाविकांसाठी काही सार्वजनिक मंडळानी खिचडीचा प्रसाद ठेवण्यात आला होता.

सांगलीचे आराध्यदैवत म्हणून गणेशाची ओळख आहे. कृष्णाकाठावर उभारण्यात आलेल्या गणपती पंचायतन मंदिरात दर्शनासाठी आज सकाळपासून भाविकांची मोठी गर्दी होती. अंगारकी संकष्टीनिमित्त मंदिरातील श्रींची मूर्ती पानाफुलांनी सजविण्यात आली होती. तसेच मंदिरावरही सोमवारपासूनच नयनरम्य विद्युत रोषणाई करण्यात आली होती. श्रींच्या गाभाऱ्यापुढील जलशयात कारंजेही लक्षवेधी ठरले होते. या पूर्ण वर्षामध्ये एकच अंगारकी संकष्टी असून आणि तीही सर्वाधिक सण, व्रतवैकल्य असलेल्या श्रावण महिन्यात असल्याने भाविकांनी गणेशदर्शनासाठी प्राधान्य दिले होते.

गणपती पेठेत संकष्टीनिमित्त दर्शनासाठी वाहनधारकही मोठ्या प्रमाणात आल्याने गणपती पेठेत वारंवार वाहतूक कोंडी होत होती. पेठेत मालवाहूक करणाऱ्या मोठ्या वाहनांना आज संकष्टीमुळे प्रवेशबंदी असतानाही काही मालट्रक आल्याने वाहतुकीवर मोठा ताण निर्माण झाला होता. मिरज-तासगाव मार्गावरील काकडवाडी येथे स्वयंभू गणेश मंदिरही गेल्या दहा वर्षात प्रसिध्दीस आले असून याठिकाणीही भाविकांची गर्दी होती. मुख्य रस्त्यावरच वाहने लावण्यात आल्याने वाहनांच्या दोन किलोमीटर अंतरापर्यंत रांगा लागल्या होत्या.

तसेच सांगली-हरिपूर मार्गावर असलेल्या बागेतील गणपती मंदिरातही दर्शनासाठी भाविकांच्या सकाळपासून लांबच लांब रांगा लागल्या होत्या. चिंचेच्या बनात असलेल्या बागेतील गणेश मंदिरात भारतरत्न लता मंगेशकर सांगली दौऱ्यावर आल्यानंतर आवर्जुन दर्शनासाठी जात होत्या. तसेच नित्यनियमाने बागेतील गणेश दर्शनासाठी सांगलीतून पायी जाणाऱ्या भाविकांची संख्याही मोठी आहे. या ठिकाणीही अंगारकी संकष्टीच्या निमित्ताने पूजेसाठी लागणाऱ्या साहित्यांची विक्री करणाऱ्या दुकानाची आज गर्दी झाली होती.

सात मजली गोपूरसाठी पश्चिम महाराष्ट्रात प्रसिध्द असलेल्या तासगाव येथेही गणेश दर्शनासाठी तासगावसह परिसरातील भाविक आले होते. उजव्या सोंडेचा गणपती म्हणून तासगावच्या गणेशाचे दर्शन अंगारकी संकष्टीला घेतल्यास पुण्य पदरी पडते, अशी भाविकांची श्रध्दा असल्याने गर्दी झाली होती. गर्दीमुळे मुख्य रस्त्यावर वाहनांची वाहतूक कोंडीही मोठ्या प्रमाणात आज होत होती. अंगारकी संकष्टीचा मुहूर्त पाहून पंधरा दिवसांनी साजरा होत असलेल्या गणेशोत्सवाची अंतिम तयारी सार्वजनिक मंडळानी आजपासून सुरू केली.