scorecardresearch

लग्नाचे आमिष दाखवून फसवणाऱ्या टोळीचा शोध

लग्नाचे आमिष दाखवून रोकड व सोन्याचे दागिने लुटणाऱ्या एका टोळीचा छडा सोलापूरच्या फौजदार चावडी पोलिसांनी लावला आहे.

arrest
प्रातिनिधिक छायाचित्र

सोलापूर : लग्नाचे आमिष दाखवून रोकड व सोन्याचे दागिने लुटणाऱ्या एका टोळीचा छडा सोलापूरच्या फौजदार चावडी पोलिसांनी लावला आहे. संतोष काशीराम गवंडी व भारती चंद्रकांत पवार (दोघे रा. धुत्तर्गी तांडा, ता. सिंदगी, जि. विजापूर) या दोघांना अटक झाली असून त्यांच्या इतर साथीदारांचा शोध घेतला जात आहे.

मनोहर आण्णा जाधव (वय ९७, रा. कडलास, ता. सांगोला) यांच्या नातवाच्या लग्नासाठी स्थळ पाहिले जात असताना त्यांच्याशी संतोष गवंडी व भारती पवार यांचा संपर्क झाला. त्यांनी लग्नासाठी दाखविलेली मुलगी जाधव कुटुंबीयांना पसंत पडली. आमचा संसार पुरात वाहून गेला असून कोणतीही कागदपत्रे नाहीत, कोणी जवळचे पाहुणेदेखील नाहीत, असे संतोष गवंडी याने जाधव कुटुंबीयांना सांगितले. तसेच आपण गरीब असल्यामुळे विवाहाच्या तयारीसाठी दीड लाख रुपयांची निकडही त्याने सांगितली. त्यानुसार विश्वास ठेवून जाधव यांनी संतोष गवंडी यास ८० हजारांची रोकड दिली. मुलगी बघायला आल्यानंतर लगेचच घाईघाईने साखरपुडा उरकण्यात आला. १६ मार्च रोजी कडलास येथे जाधव यांच्या घरी विवाह करण्याचे निश्चित झाले होते. विवाहाच्या एक दिवस अगोदर नवरी मुलीला गावी नेण्यासाठी नवऱ्या मुलाचे आजोबा सोलापुरात आले. त्या वेळी मुलीला सोन्याचे दागिने घेऊन या म्हणून समोरच्या व्यक्तींनी बजावले. त्यानुसार मुलाचे आजोबा दोन तोळे सोने खरेदी करून आले. दागिने घेऊन एसटी बसस्थानकावर या, तेथून नवरी मुलीला घेऊन गावाकडे जाऊ असे संतोष गवंडी याने सांगितले होते. त्याप्रमाणे मुलाचे आजोबा एसटी बसस्थानकावर आले असता संतोष गवंडी याने त्यांना दुचाकीवर बसवून हिराचंद नेमचंद वाचनालयाजवळ आणले. तेथे दोन महिला भेटल्या. या महिलांनी नव्या पेठेत नवरी मुलीसाठी बांगडय़ा घेण्यासाठी आल्याचे सांगत, आपल्या एका अपंग नातलगाला सोन्याचे दागिने दाखवून आणतो म्हणून जाधव यांच्याकडून दागिने घेऊन त्या दोन्ही महिला निघून गेल्या. नंतर संतोष गवंडी यानेही त्या महिलांना घेऊन येतो म्हणून काढता पाय घेतला. खूप उशीर झाला तरी गवंडीसह कोणीही परत आले नाहीत. तेव्हा मुलाचे आजोबा जाधव यांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. त्यांनी मुलगा, सून व नातू नवरा मुलगा यांना बोलावून घेतले. हा फसवणुकीचा प्रकार लक्षात आला असता शेवटी पोलिसांत धाव घेण्यात आली. पोलिसांनी भ्रमणध्वनीवरून गवंडी याचा ठावठिकाणा शोधला असता तो आणि भारती पवार हे दोघेही जुळे सोलापुरात कल्याणनगरात सापडले. या टोळीने यापूर्वी एक मुलगी लग्नासाठी म्हणून दाखवत सोलापूरसह सातारा, उस्मानाबाद आदी भागातील तरुणांना आर्थिक गंडा घातल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Gang involved in cheating people on pretext of marriage busted two held zws

ताज्या बातम्या