कल्याणमध्ये राहणाऱ्या १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर चार मुलांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी कल्याणच्या कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी चार मुलांना ताब्यात घेतलं आहे. यापैकी एकजण अल्पवयीन आहे अशीही माहिती समोर आली आहे. इंस्टाग्राम या सोशल मीडियावरच्या माध्यमावर मुलांशी मैत्री करणं या अल्पवयीन मुलीला भोवलं आहे.
नेमकी काय घडली घटना?
कल्याणमधल्या एका पंधरा वर्षीय मुलीची इंस्टाग्रामवर काही तरुणांशी ओळख झाली. यापैकी एका तरुणाने या अल्पवयीन मुलीला माझं प्रेयसीसोबत भांडण झालं आहे असं सांगून भेटायला बोलावलं. त्यानंतर तिला रुमवर घेऊन जात तिच्यावर बलात्कार केला, तसंच दुसऱ्या दिवशीही तिला बोलवून तिच्यावर बलात्कार केला. या घटनेनंतर आणखी तीन जणांनी या मुलीवर बलात्कार केला. पीडित मुलीच्या घरातल्यांनी मुलगी हरवल्याची तक्रार केली होती. पोलीस त्या अनुषंगाने तपास करत होते. त्यांनी या पीडित मुलीची सुटका केली. या प्रकरणात पोलिसांना चार जणांना ताब्यात घेतलं आहे. साहिल राजभर, सुजल गवळी आणि विजय बेरा अशी आरोपींची नावं आहेत. चौथा आरोपी अल्पवयीन आहे. या अल्पवयीन मुलाची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आली आहे.
पोलिसांनी काय म्हटलं आहे?
अल्पवयीन मुलीच्या आईने मुलगी किडनॅप झाल्याची तक्रार कोळसेवाडी पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार आम्ही तिचा शोध घेत होतो. ही मुलगी २२ एप्रिलला कल्याण रेल्वे स्टेशनवर आढळली. तिला आम्ही ताब्यात घेतलं आणि तिची चौकशी केली. त्यावेळी तिने हे सांगितलं तिच्या एका मित्राने इंस्टाग्रामवरुन तिला मेसेज केला. त्याने या मुलीला सांगितलं माझ्या प्रेयसीचे आणि माझे भांडण झालं आहे कारण तिला वाटतं आहे की आपलं अफेअर आहे. आपल्यात असं काहीही नाही हे सांगायला तू ये. असं सांगून पीडित तरुणीला उल्हासनगर या ठिकाणी बोलवलं. त्यानंतर तिला मित्राच्या रुमवर नेऊन तिच्यावर बलात्कार केला. ही घटना घडल्यानंतर दुसऱ्या दिवशीही तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्याच्या तीन मित्रांनाही त्याने रुमवर बोलावलं. या तिघांनीही तिच्यावर बलात्कार केला. मुलीने सांगितलेल्या या घटनेनंतर सामूहिक बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी चौघांना ताब्यात घेण्यात आलं आहे. पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय घोडे यांनी ही माहिती दिली.