तालुक्यातील उन्हाळे तीर्थक्षेत्री रविवारी सकाळी ८ वा. च्या सुमारास गंगामाईचे अचानकपणे आगमन झाले. तब्बल १७१ दिवसांनी आगमन झालेली गंगामाई मूळगंगा, गायमूख आणि चौदाही कुंडांमध्ये दमदारपणे प्रवाहित आहे. हवामानत झालेल्या कमालीच्या बदलावामुळे सर्वत्र पाणीटंचाई असताना गंगामाईच्या अचानक झालेल्या आगमनाबाबत भाविकांमध्ये कुतूहूल निर्माण झाले आहे. त्यातच, दर तीन महिन्यांनी येणारी गंगामाई गेल्या सहा वर्षांंपासून सातत्याने येत आहे. त्यामुळे गंगामाईच्या आगमन आणि निर्गमनामध्ये झालेल्या बदलाबाबतही साऱ्यांमध्ये कुतूहूल निर्माण झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गंगापुत्र राहुल काळे हे नेहमीप्रमाणे रविवारी सकाळी गंगास्थानी गेले होते. यावेळी त्यांनी गंगामाईचे आगमन झाल्याचे निदर्शनास आले. ही माहिती त्यांनी गंगा देवस्थानचे पदाधिकारी श्रीकंत घुगरे यांना देताच ते तातडीने गंगास्थानी दाखल झाले. दरम्यान, गंगेच्या आगमनाची बातमी कर्णोपकर्णी होता अनेकांच्या त्यावर विश्वास बसत नव्हता. त्यातच, गेल्या काही वर्षांपासून सातत्याने गंगामाईचे आगमन होत असल्याने गंगा आगमनाची बातमी अफवा असल्याचेही अनेकांना वाटले. मात्र, प्रत्यक्षात अनेकांनी गंगा तीर्थक्षेत्री भेट दिल्यानंतर प्रत्यक्षात मूळ गंगेसह सर्व कुंडामधून गंगा प्रवाहित असल्याचे पाहून आश्र्चयाचा साऱ्यांना धक्का बसला. राज्यासह राज्याबाहेरील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या गंगामाईचे गतवर्षी  ३१ ऑगस्ट रोजी आगमन झाल्यानंतच सुमारे ८८ दिवसांचे वास्तव्य करून गंगामाई निर्गमित झाली होती. गेल्या काही दिवसांपासून तालुक्यामध्ये अवकाली पावसाने दमदार हजेरी लावली होती. त्याप्रमाणे अवकाली पावसाने काल रात्रीही सोसाटय़ाच्या वार्यासह तालुक्यात दमदार हजेरी लावली. त्यामुळे बदललेले वातावरण आणि पाण्याचा दुष्मकाळ पडलेला असताना गंगामाईच्या झालेल्या आगमनाने भाविक चांगलेच सुखावले आहेत. सध्या सकळच्या सत्रामध्ये शाळा भरत असल्याने दुपारनंतर मुले घरीच असतात. त्यातच, उन्हाळी सुट्टी घालविण्यासाठी मुंबईकर चाकरमनी कुटुंबियांसमवेत सध्या कोकणात दाखल झाले आहेत. गंगामाईच्या पवित्र स्नानाची अनोखी संधी साधण्याची या साऱ्यांना पर्वणी ठरणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganga appeared in rajapur
First published on: 08-05-2017 at 01:35 IST