सिंहस्थ कुंभमेळा उंबरठय़ावर आला असताना शहरातील गुंडगिरी शमण्याचे नाव न घेता उलट दिवसेंदिवस वाढतच असल्याने जणू काही नाशिकमध्ये गुंडांचे राज्य असल्याची टीका राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आ. जयंत जाधव यांनी पोलीस आयुक्त एस्. जगन्नाथन यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. गुन्हेगारी त्वरित नियंत्रणात न आणल्यास राष्ट्रवादीतर्फे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
जाधव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार, शिवाजी चुंभळे, कविता कर्डक आदी उपस्थित होते. शहरात मोठय़ा प्रमाणात गुंडगिरी आणि गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. शहरात पाच जुलै रोजी व्यापाऱ्यांवर दुसऱ्यांदा सशस्त्र हल्ला करून लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला. काही दिवसापूर्वी बेपत्ता झालेल्या अजिंक्य घोलपचे गूढ कायम असताना सातपूर-अंबड लिंकरोडवरून चार वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण झाले. हनुमानवाडीतील संदीप कुमावत, सातपूरमधील संतोष सिंगसारख्या अनेक युवकांचा किरकोळ कारणावरून खून झाल्याचे निवेदनात म्हटले आहे. दोन लाखाच्या खंडणीसाठी पंचवटीतील बिल्डरला २७ एप्रिल रोजी धमकी देण्यात आली. जूनच्या पहिल्या आठवडय़ात एन. डी. पटेल रोडवर तरुणाची हत्या करण्यात आली. पंडित कॉलनीत वाईन व्यावसायिकावर हल्ला करून १७ लाखाची लूट करण्यात आली. शंकरनगरमध्ये सराफी दुकान पोडून दागिन्यांची चोरी झाली. २० मे रोजी पंचवटी, उपनगर तसेच जुन्या नाशकातील कुंभारवाडा भागात दुचाकी व चारचाकी वाहनाची जाळपोळ झाली. वकीलवाडीत भरवस्तीत पोलीस पुत्रावर चाकू हक्का करण्यात आला. अशा एक ना अनेक घटना पोलीस यंत्रणेला आव्हान देत असून शहरातील गुन्हेगारी टोळ्या पुन्हा सक्रिय झाल्याचे यावरून दिसून येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. जानेवारी ते मे २०१५ या कालावधीत २९ खून, २० खुनाचे प्रयत्न, १४ बलात्कार, तीन दरोडे, ११३ घरफोडय़ा, ७१ जबरी चोऱ्या, ४०६ वाहन व मोबाईल चोरी व ४७ विनयभंगाचे गुन्हे घडले असून त्यात दिवसागणिक वाढ होत आहे. गत वर्षभरात २६ खून झालेले असल्याने त्या तुलनेने अलीकडील पाच महिन्यात २९ खून झाल्यामुळे नाशिक शहरात गुन्हेगारीचे भीषण वास्तव समोर येत असून शहराची कायदा सुव्यवस्था धोक्यात आली आहे. पोलीस यंत्रणेचा गुन्हेगारांवर कोणताही धाक व वचक नसल्यामुळे रोजच किरकोळ कारणामुळे हाणामारी, चाकूहल्ला, लूटमार, वाहनांची जाळपोळ, बलात्कार, अपहरण, खून अशा घटना घडत असल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gangsters create fear in nashik city
First published on: 10-07-2015 at 12:42 IST